Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदाच्या तर संजय घाडी उपमहापौरपदाचे उमेदवार, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
देशातील सर्वात श्रीमंत आणि महत्त्वाची महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. अनेक वर्षांपासून प्रशासकाच्या नियंत्रणाखाली असलेल्या मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींचे नेतृत्व दिसून येत असून, आजचा दिवस पालिकेच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा ठरला आहे. आज मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी शिंदेसेनेचे नेते संजय शंकर घाडी यांची आणि महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यामुळे मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट होत असून भाजप-शिंदेसेना युतीचा प्रभाव दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेवर प्रशासकीय राजवट होती. निवडणुका रखडल्याने महापौर, उपमहापौर यांसारखी घटनात्मक पदे रिक्त होती. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रश्नांवर निर्णय घेणारी थेट लोकप्रतिनिधी व्यवस्था अस्तित्वात नव्हती. मात्र आता या स्थितीत बदल घडताना दिसत आहे. आज उपमहापौर निवडीमुळे महापालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
संजय घाडी पुढील सव्वा वर्षांसाठी मुंबईचे उपमहापौर असणार आहेत. या कालावधीत मुंबईतील पायाभूत सुविधा, नागरी समस्या, वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था आणि विकासकामांवर त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः प्रशासक काळात प्रलंबित राहिलेल्या अनेक निर्णयांवर आता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
