Sanjay Raut : "अजित दादांचा अपघात हा महाराष्ट्रावर झालेला आघात"
(Sanjay Raut) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, "काल शरद पवार साहेब यांनी त्याबाबत खुलासा केला. हा एक अपघात आहे. आता चौकशी कसी व्हायला पाहिजे तर काही तांत्रिक चुका झाल्यात का? विमानामध्ये काही अचानक बिघाड झाला का? विमानतळावर यंत्रणेच्या काही त्रुटी होत्या का? आतापर्यंत असे अनेक अपघात या देशामध्ये झालेत. त्यांच्या चौकशीचे काय झाले? हा काल अजित पवार यांच्या अपघातानंतर निर्माण झालेला प्रश्न आहे. बारामतीच्या त्या छोट्या विमानतळावर अजित पवार अनेकदा उतरले आहेत. नेमका काल असा त्या विमानामध्ये बिघाड झालेला दिसतंय."
"अजित दादांचा अपघात हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. अजित दादांसारखा नेता ज्या पद्धतीने अपघातामध्ये आम्हाला सोडून गेला त्यानंतर या सर्व विषयावर महाराष्ट्राची जनता अत्यंत गांभीर्याने पाहते. महाराष्ट्रावर ज्या प्रकारची शोककळा पसरली आहे. अजित दादांचे असे अचानक जाणे हा धक्का महाराष्ट्र अद्याप पचवू शकला नाही. पुढील अनेक दिवस महाराष्ट्राला या धक्क्याला सावरता येणार नाही."
"अशा नेत्याचे अकाली जाणे हे काल चित्र आपण पाहिलं असेल. आक्रोश, लोक अश्रू ढाळत होते. हे भाग्य फार कमी लोकांना मिळतं. हे पैशाने विकत मिळत नाही. तुम्ही या लोकांसाठी काहीतरी केलेलं आहे, राज्यासाठी काहीतरी केलेलं आहे. त्यातून हे हुंदके, अश्रू महाराष्ट्राने पाहिले. विलासराव देशमुख यांच्यानंतर रुबाबदार आणि असा लोकप्रिय नेता महाराष्ट्राने गमावला आहे. दादा या महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रमुख स्तंभ होता." असे संजय राऊत म्हणाले.
