Sanjay Raut
Sanjay Raut

Sanjay Raut: मुंबईतील बिहार भवनावरून संजय राऊतांची आक्रमक अट, राजकीय वाद पेटला

Bihar Bhavan: मुंबईतील बिहार भवनाच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी बिहार सरकारला प्रत्युत्तर देत पाटण्यात महाराष्ट्र भवनासाठी 5 ते 6 एकर जागेची मागणी केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मुंबईत ३० मजली बिहार भवन उभारण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र आणि बिहारच्या राजकारणात नवा कलगीतुरा रंगला आहे. बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी 'आम्ही मुंबईत बिहार भवन बांधूनच दाखवू, कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवा' असे आव्हान देताच शिवसेना (ठाकरे गट) ने खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. राऊत यांनी बिहार सरकारला सडेतोड उत्तर देताना पाटण्यात महाराष्ट्र भवनासाठी ५ ते ६ एकर जागेची मागणी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, 'भारतीय संविधानाने प्रत्येकाला देशात कुठेही राहण्याचा आणि काम करण्याचा अधिकार दिला आहे. हे आम्हालाही माहिती आहे. पण बिहारच्या मंत्र्यांनी वापरलेली भाषा अधिक संयमी आणि सौम्य असायला हवी होती. मुंबईत आधीच अनेक राज्यांची भवने आहेत, पण ज्या पद्धतीने ते आव्हान देत आहेत, ते चुकीचे आहे.' मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल तर जमीन मुंबईचीच वापरावी, ती पाटण्यातून आणू नका, असेही त्यांनी सांगितले.

राऊत यांनी पुढे स्पष्ट केले, 'तुम्हाला मुंबईत जागा हवी असेल तर बिहार सरकारने पाटण्यातील गोला रोड किंवा न्यू पाटलीपुत्र कॉलनीसारख्या मोक्याच्या ठिकाणी ५ ते ६ एकर जागा द्यावी. तिथे आम्ही ३० मजली भव्य महाराष्ट्र भवन उभारू. महाराष्ट्रातील असंख्य लोक बिहारला जातात, त्यांना तिथे राहण्याची सोय हवी. ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे आणि ती देशभरात स्वीकारायला हवी. फक्त मुंबईवरच आक्रमण का?'

मुंबईची अवस्था समजून घ्या, असा इशारा देत राऊत म्हणाले, 'जागा हवीच असेल तर गौतम अदानींकडून बाजारभावाने विकत घ्या. सरकारकडून मोफत किंवा सवलतीच्या दरात हवी असेल तर आधी देवाणघेवाण करा. आम्ही देशाचे संविधान मानणारे लोक आहोत, तुमच्यासारखे आकांत तांडव करणारे नाही. मुंबईत विनाकारण वातावरण बिघडू नये.' या वादाने महाराष्ट्र-बिहार संबंधांवर नव्या प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com