Sunil Tatkare: “विलीनीकरणाचा प्रश्नच नाही; आम्ही कायम एनडीएतच” सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर सुनील तटकरेंचे स्पष्ट विधान
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना तटकरेंनी “विलीनीकरणाचा मुद्दाच येत नाही” असे ठामपणे सांगितले. “आम्ही अजितदादांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता आणि भविष्यातही एनडीएसोबतच राहणार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाचा निर्णय जाहीर होऊ शकतो, असा दावा शरद पवार गटाकडून केला जात होता. मात्र, अजित पवार गटातील नेत्यांनी अशा कोणत्याही चर्चेला अधिकृत दुजोरा दिलेला नव्हता.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच राज्यसभेचे सभापती यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सुनील तटकरेही उपस्थित होते. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना तटकरेंनी पक्षाच्या भूमिकेबाबत स्पष्टता दिली.
“विलीनीकरण कोणत्या पक्षात करायचे, हा मूलभूत प्रश्नच आहे. आम्ही आधीपासून एनडीएमध्ये आहोत. दादांनी जिवंत असतानाच ही भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला आणि तीच भूमिका आजही कायम आहे,” असे तटकरे म्हणाले.
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबतही त्यांनी भूमिका मांडली. “उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असाव्यात, ही आमची भूमिका होती आणि त्यानुसार निर्णय झाला,” असे ते म्हणाले. तटकरे यांनी 2019 मधील राजकीय पार्श्वभूमीचा उल्लेख करत अजित पवार यांची भूमिका स्पष्ट केली. “तीन पक्षांपेक्षा दोन पक्षांनी एकत्र येऊन राज्याचा विकास साधावा, असा दादांचा विचार होता. राष्ट्रवादीच्या बैठकीतही एनडीएत जाण्याबाबत त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले होते,” असे ते म्हणाले.
विलीनीकरणाच्या चर्चांना फेटाळून लावत तटकरेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “भविष्यात काय होईल हा वेगळा मुद्दा असू शकतो; मात्र आमची सध्याची आणि पुढील भूमिका एनडीएसोबतच राहण्याची आहे.” तटकरेंच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चांना काही प्रमाणात विराम मिळण्याची शक्यता असली, तरी पुढील राजकीय हालचालींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
