Weather Update : राज्यासह देशात हवामानाचा लहरी खेळ; थंडी, पाऊस आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण
राज्यासह देशभरात सध्या हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. कधी कडाक्याची थंडी, कधी अचानक पाऊस तर मध्येच वाढलेला उकाडा अशा त्रिसूत्री हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये तीव्र थंडीचा प्रभाव जाणवत असताना महाराष्ट्रात मात्र म्हणावी तशी थंडी जाणवत नाही. सकाळी आणि संध्याकाळी थोडा गारवा जाणवतो, मात्र दुपारच्या वेळी उन्हाचा चटका नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर मात्र थंडीचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले. डिसेंबर महिन्यात जाणवलेली कडाक्याची थंडी जानेवारीत कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात जानेवारीत थंडीऐवजी उकाडाच अधिक जाणवत असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, राज्यातील काही मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. थंडी कमी झाल्याने आणि वातावरणातील बदलांमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पुणे शहरात पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यात किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली होती, त्यामुळे उष्णतेचा चटका जाणवत होता. मात्र सोमवारी तापमानात घट नोंदवली गेली असून, सध्या हलका गारठा जाणवत आहे.
राज्यातील सर्वात नीचांकी तापमान नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे नोंदवले गेले आहे. निफाडमध्ये किमान तापमान 7.9 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, तर गोंदियामध्ये 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड, गोंदिया आणि धुळे परिसरात पुढील काही दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशातील काही भागात भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला असून, काही ठिकाणी रिमझिम तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांत प्रदूषण वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकूणच देशभरात कधी थंडी, कधी पाऊस तर कधी उकाडा अशी विचित्र हवामानस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
