Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे तीन बडे नेते ‘वर्षा’वर; मुख्यमंत्र्यांशी निर्णायक चर्चा

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे तीन बडे नेते ‘वर्षा’वर; मुख्यमंत्र्यांशी निर्णायक चर्चा

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांचे भीषण विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्याच्या सत्ताकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. बुधवारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांचे भीषण विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्याच्या सत्ताकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असून, महायुती सरकारसमोरही अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे राहिले आहेत.

अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थखाते आणि इतर महत्त्वाची खाती होती. त्यामुळे आता ही खाती कोणाकडे जाणार, राज्याचा आगामी अर्थसंकल्प कोण सादर करणार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील दिशा काय असेल, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील ‘वर्षा’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीचे तीन बडे नेते दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादीचे तीन नेते ‘वर्षा’वर दाखल

मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचले आहेत. या भेटीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडील खाती ही राष्ट्रवादी पक्षालाच मिळावीत, अशी आग्रही मागणी या नेत्यांकडून करण्यात येणार आहे.

विशेषतः अर्थखात्यावरून सध्या मोठी खलबतं सुरू आहेत. राज्याचा आगामी अर्थसंकल्प राष्ट्रवादीकडीलच एखादा मंत्री सादर करावा, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अर्थसंकल्प मांडावा, यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. अर्थखाते हे राष्ट्रवादीकडेच राहावे, अशी भूमिका पक्षाचे नेते घेत असल्याचे बोलले जात आहे.

सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुढे आली आहे. अनेक नेत्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची चर्चा आहे. मात्र, उपमुख्यमंत्रीपदासोबतच अजित पवार यांच्याकडे असलेली अर्थ, उत्पादन शुल्क आणि इतर खाती नेमकी कुणाकडे सोपवायची, हा खरा पेच ठरत आहे. याच मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी आज ‘वर्षा’वर ही निर्णायक बैठक होत असल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी एकत्रीकरणाला वेग?

या सगळ्या घडामोडींमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाची चर्चाही पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीही या चर्चा सुरू होत्या. दिवंगत अजित पवार यांनीही याबाबत काहीवेळा सकारात्मक संकेत दिले होते. त्यांच्या अचानक निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता अधिक बळावल्याचे बोलले जात आहे.

मात्र, एकत्रीकरण झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा घटक राहणार की महाविकास आघाडीत सहभागी होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला लवकरच नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com