Rahul Shewale
Rahul Shewale

Rahul Shewale : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना टपाल तिकीटातून मानवंदना; राहुल शेवाळेंचा पुढाकार

हिंदुहृदयसम्राट यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी खासदारांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राजेश गुप्ता

मुंबई | हिंदुहृदयसम्राट यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी खासदार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री यांना लेखी निवेदन सादर केले असून, या मागणीबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचे समजते.

निवेदनात राहुल शेवाळे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाचा सविस्तर उल्लेख केला आहे. 1960 च्या दशकापासून पुढील सुमारे पाच दशके महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या राजकीय जीवनावर बाळासाहेब ठाकरे यांनी अमिट छाप उमटवली. एक परखड हिंदुत्ववादी लोकनेता, महान व्यंगचित्रकार, प्रभावी संपादक आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्ते अशा विविध भूमिकांतून त्यांनी आपले विचार निर्भीडपणे मांडले, असे शेवाळे यांनी नमूद केले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीतील धार, त्यांच्या ज्वलंत भाषणांची शैली आणि व्यंगचित्रांमधून व्यक्त होणारा रोखठोक आशय यामुळे सामान्य माणसाच्या मनात स्वाभिमान, आत्मविश्वास आणि लढाऊ वृत्ती निर्माण झाली. त्यांच्या विचारांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील कोट्यवधी नागरिकांना दिशा दिली, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, 27 जानेवारी रोजी देशभरात बाळासाहेब ठाकरे यांची 100 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्याची इच्छा देशभरातील लाखो शिवसैनिक आणि समर्थक व्यक्त करत आहेत. ही भावना लक्षात घेता केंद्र सरकारने विशेष टपाल तिकीट जारी करून वंदनीय शिवसेनाप्रमुखांना यथोचित सन्मान द्यावा, अशी जोरदार मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.

“माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकांसाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे सदैव स्फूर्तीस्थान राहिले आहेत. त्यांच्या परखड विचारांनी सामान्य माणसाला आत्मविश्वास दिला. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विशेष टपाल तिकीट जारी करून त्यांना अनोखी आदरांजली द्यावी, अशी मागणी मी केंद्रीय दळणवळण मंत्र्यांकडे केली आहे. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच भारतीय टपाल विभागाकडून असे विशेष टपाल तिकीट जारी होईल, याची मला खात्री आहे.” — राहुल रमेश शेवाळे, शिवसेना माजी खासदार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com