ZP Voting
ZP Voting

ZP Voting : जिल्हा परिषदच्या निवडणुका संपन्न, कोणत्या जिल्ह्यात किती मतदान जाणून घ्या...

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मतदार आपला हक्क बजावत आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ५ फेब्रुवारीला होणारे मतदान पुढे ढकलण्यात आले होते. अखेर आज या निवडणुकीचा दिवस उजाडला आहे.

सकाळी ७.३० पासून मतदानास सुरुवात

आज सकाळी ७.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. यानंतर ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रत्येक मतदाराला दोन मते देण्याची संधी असून, पांढऱ्या रंगाच्या ईव्हीएमवर जिल्हा परिषदेसाठी तर गुलाबी ईव्हीएमवर पंचायत समितीसाठी मतदान करावे लागणार आहे.

राज्यभरात दोन कोटींहून अधिक मतदार असून, तब्बल २५ हजार ४७१ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १,४६२ गणांसाठी एकूण ७,४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाचा जोर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी सुमारे ४० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

आकडेवारीनुसार, दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ५ लाख २२ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ११.३० वाजेपर्यंत १९ टक्के मतदान झाले होते, ज्यामध्ये ३ लाख ५४ हजार मतदारांचा सहभाग नोंदवण्यात आला होता.

बोगस मतदानाचे आरोप

दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी वाळूज परिसरात बोगस मतदान होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे बोगस मतदानाबाबत तक्रारी केल्याचे त्यांनी सांगितले.

शिरसाट यांच्या म्हणण्यानुसार, शहरातील भावसिंगपुरा परिसरातून काही लोकांना बसमधून मतदानासाठी आणण्यात आले. तसेच, काही ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावावर मतदान झाल्याचेही निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

ज्येष्ठ मतदारांचा सहभाग

निवडणुकीबाबत मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एका ९३ वर्षीय आजींनी जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

निवडणूक प्रक्रियेवर लक्ष

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिवसभर विविध ठिकाणी भेटी देत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे की नाही, याचा आढावा घेतला. प्रशासनाकडून शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने मतदान पार पडावे, यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com