"राज ठाकरेंच्या वक्तव्याला पाठिंबा, फक्त अमित ठाकरेंना..." - सुजात आंबेडकर
राज ठाकरे यांनी काल गुडी पाडवा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यानं राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यांवरून (Loudspeaker) केलेल्या वक्तव्यामुळे तणाव नर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपूत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा त्यासमोर भोंगे लावून हनुमान चालिसा वाजवू असा इशारा काल राज ठाकरेंनी दिला. त्यानंतर आता सुजात आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, राज ठाकरेंच्या वक्तव्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे, फक्त हनुमान चालिसा म्हणायला जाताना अमित ठाकरेंना आधी हनुमान चालिसा म्हणालया सांगा. तिकडे एकही बहुजन तरुण मला नकोय असं ते म्हणाले. तसंच पुढे ते म्हणाले की, तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लीम वादावर उभा करु नका, दंगली झाल्या तर कुणाला पकडायचं हे पोलिसांना माहितीये. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी विरुद्ध मनसे असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
दरम्यान, राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र असदुद्दीन ओवैसी यांनी या विषयावर बोलू नका असे आदेश पक्षाच्या लोकांना दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, कोणतीही चर्चा करु नका असं ओवैसींनी म्हटलं आहे.

