Ganesh Utsav 2023: गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’चं का बरं म्हणतात? जाणून घ्या सुंदर गणेश कथा!

Ganesh Utsav 2023: गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’चं का बरं म्हणतात? जाणून घ्या सुंदर गणेश कथा!

महाराष्ट्राचं आराध्य दैवत लाडक्या गणपती बाप्पाचं घराघरात आगमन झालं आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोष केला जात आहे. पण गणपती बाप्पा मोरया, असं का म्हणलं जात असावं.
Published by  :
Team Lokshahi

महाराष्ट्राचं आराध्य दैवत लाडक्या गणपती बाप्पाचं घराघरात आगमन झालं आहे. गणरायाच्या आगमनानं गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. बुद्धीच्या देवाची सर्वत्र मनोभावे सेवा अर्थातच पूजा केली जात आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोष केला जात आहे. पण गणपती बाप्पा मोरया, असं का म्हणलं जात असावं. यामागे काय कारण असावं, असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे ना, याबाबत एक सुंदर कथा आहे. जाणून घ्या...

गणेश चतुर्थीला घराघरात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला कोणी ‘गणेश’ म्हणतं तर कोणी ‘एकदंत’. कोणी ‘विनायक’ म्हणतं तर कुणी ‘गजानन’. भक्तांचा लाडका बाप्पा फक्त एकच ‘गणपती बाप्पा’ आहे. पण गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ हा शब्द का जोडला जात असावा, हे कदाचित फार कमी लोकांना माहित असावं. गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ शब्द आला यामागे सुमारे 600 वर्षांचा इतिहास आहे. प्राचीन तितकीच सुंदर पौराणिक कथा आहे.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर चिंचवड गाव आहे. सन 1375 मध्ये जन्मलेले ‘मोरया गोसावी’ हे श्रीगणपतीचे परम भक्त होते. ‘मोरया गोसावी’ प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या अष्टविनायक गणपतींपैकी एक मयुरेश्वर गणपती (Mayureshwar Ganpati) मंदिरात दर्शनासाठी जात असतं. विशेष म्हणजे मोरया गोसावी यांनी वयाच्या 117 वर्षापर्यंत नियमितपणे मयुरेश्वरचं दर्शन घेतलं. परंतु नंतर वृद्धकाळामुळे त्यांना मयुरेश्वराच्या मंदिरात जाणं शक्य होत नव्हतं. यामुळे मोरया गोसावी नेहमी दुः खी असत. एके दिवशी श्रीगणेशानं मोरया गोसावी यांच्या स्वप्नात दृष्टांत दिला. ‘उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल’, असंही सांगितलं.

दुसऱ्या दिवशी मोरया गोसावी चिंचवडच्या कुंडामध्ये स्नानासाठी गेले. कुंडामध्ये त्यांनी डुबकी लावली. पाण्यातून बाहेर येत असताना त्यांच्या हाताला गणपतीची एक छोटी मूर्ती लागली. देवानंच आपल्यालं दर्शन दिलं असं समजून मोरया गोसावी यांनी गणपतीची मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना केली. नंतर मोरया गोसावी यांचं निधन झालं. मोरया गोसावी यांची समाधीही मंदिरातच बांधण्यात आली. चिंचवडमधील हे ठिकाण ‘मोरया गोसावी मंदिर’ या नावानं प्रचलित आहे. पुण्यातील चिंचवडमधून ‘गणपती बाप्पा मोरया’ या जयघोषास सुरूवात झाली. आज देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हणत लाडक्या गणेशाचा जयघोष केला जातो.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com