नागपूरमध्ये मारबत उत्सव; जाणून घ्या महत्त्व

नागपूरमध्ये मारबत उत्सव; जाणून घ्या महत्त्व

जगाच्या पाठीवर मारबत उत्सव नागपुरात साजरा होत असतो. एकाच दिवशी काळी आणि पिवळी अशा दोन्ही दोन्ही मारबती एकाचवेळी निघतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्ह्या पोळ्याच्या दिवशी हा मारबत उत्सव साजरा करतात. चला तर जाणून घेऊया या उत्सवाचं महत्व...
Published by :
Siddhi Naringrekar

जगाच्या पाठीवर मारबत उत्सव नागपुरात साजरा होत असतो. एकाच दिवशी काळी आणि पिवळी अशा दोन्ही दोन्ही मारबती एकाचवेळी निघतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्ह्या पोळ्याच्या दिवशी हा मारबत उत्सव साजरा करतात. चला तर जाणून घेऊया या उत्सवाचं महत्व... देश गुलाम असताना इंग्रजी राजवटीने जनता त्रस्त होती. सर्वत्र इंग्रजाचा अन्याय, अत्याचार सुरू होता. परकीयांच्या गुलामगिरीचे पाश तुटावेत व भारत देश स्वतंत्र व्हावा, अशा देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन जागनाथ बुधवारीतून तऱ्हाणे तेली समाजबांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना करीत हा उत्सव सुरू केला. काळ्या मारबतीला १४० वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३६ वर्षांचा इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर मात्र समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याचा मारबत उत्सवाने स्वीकारला आहे. तान्हा पोळ्याच्या दिवशी हा उत्सव उपराजधानीत साजरा करण्यात येतो.

मारबतीची मिरवणूक संपूर्ण भारतात केवळ नागपुरात काढली जाते. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज राजवटीविरोधात गुप्त बैठका घेण्यापासून तर सत्याग्रह करण्यापर्यंतची माहिती पुरवण्यासाठी या उत्सवाची तयार सहा महिन्यांपासूनच सुरू करण्यात येत होती. पुढे स्वतंत्र विदर्भाचे गाजर दाखवणारे नेते, दहशतवाद, अतिरेकी कारवाया तसेच भ्रष्टाचारी नेत्यांचे बडगे तयार करून त्यांची मिरवणूक काढण्याची परंपरा सुरू झाली.

दिवंगत आप्पाजी व बटानजी भाऊ खोपडे यांनी बांबुच्या कमच्या व कागद लावून ३ ते ४ फूट उंचीची बाहुलीसारखी मारबत तयार करून लोकांच्या मदतीने शहरात तिची मिरवणूक काढली. नाईक तलावात तिचे विसर्जन करण्यात आले. तर १९१३-१४ मध्ये लक्ष्मणराव व रामाजी खोपडे यांनी गणपतराव शेंडे यांच्याकडून २० फूट उंचीची बैठकी पिवळी मारबत तयार करून घेतली. त्यानंतर समाजातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मारबतीचा उत्सव सुरू केला. गजानन शेंडे हे पिवळी मारबत बनवण्याचे काम अविरत उत्साहाने करीत होते. यानंतर भिमाजी शेंडे व नातू गणपत शेंडे यांनी पिवळी मारबत तयार करण्याचे काम केले.

पिवळ्या मारबतीसोबतच काळ्या मारबतीलाही ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. श्री देवस्थान पंच कमेटीतर्फे गेल्या १४० वर्षांपासून इतवारी स्थित नेहरू पुतळ्यापासून काळ्या मारबतीची मिरवणूक काढली जाते. सुरुवातीला आप्पाजी मराठे काळ्या मारबतीचा उत्सव साजरा करीत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी इंग्रजांच्या कारवायांमुळे जनता त्रस्त होती. बाकाबाईने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्याचा निषेध करण्यासाठी १८८१ पासून ही काळी मारबत काढण्यात आली होती. या उत्सवाचा संबंध महाभारतापर्यंत जोडला जातो. त्याकाळात मायावी राक्षसाने श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी स्त्रीचे रूप धारण केले होते. पण श्रीकृष्णाने तिला ठार मारले. त्यानंतर गावकऱ्यांनी तिला गावाबाहेर नेऊन जाळले. तेव्हापासून मारबत हा उत्सव सुरू झाल्याची दंतकथा सांगितली जाते. हा उत्सव साजरा केल्याने गावावरचे संकट टळते, असे सांगतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com