Shravan: श्रावणातील मंगळागौरी व्रत तिथी, पूजाविधी आणि महत्व

Shravan: श्रावणातील मंगळागौरी व्रत तिथी, पूजाविधी आणि महत्व

श्रावणातील सोमवार प्रमाणेच मंगळवारचेही विशेष महत्त्व आहे. मंगळागौरी व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी पाळले जाते. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. असे मानले जाते की, हे व्रत पाळल्याने माता पार्वती प्रसन्न होते आणि तुम्हांला नेहमी भाग्यवान राहण्याचा आशीर्वाद देते.
Published by :
Team Lokshahi

श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहीत महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्ष करावयाचे व्रत म्हणजे मंगळागौरी होय. यंदा 22 ऑगस्ट, 29 ऑगस्ट, 5 सप्टेंबर आणि 12 सप्टेंबर हे श्रावणातले चार मंगळवार आहेत. श्रावण महिना हा सण, उत्सव आणि व्रतवैकल्याचा महिना मानला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला जास्त महत्व आहे. श्रावणात सातही वारांना महत्व आहेत. या पवित्र महिन्याची वाट वर्षभर पाहिली जाते. श्रावण महिना नवविवाहीतांसाठी खास असतो. तसं वर्षभर नवीन लग्न झालेल्या मुलीचं कौतुक केलं जातं. पण, श्रावण महिन्यात नव विवाहित मुली आपल्या माहेरी जाऊन मंगळागौरीचं व्रत करतात.पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी शिवपार्वतीचा आशिर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते. मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते. गौरी म्हणजे पार्वती. तिचं पूजन केलं जातं.

मंगळागौरी पूजन

अन्नपूर्णा देवीची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी. सर्वप्रथम गणपतीपूजन, कलश-घंटा-दीप पूजन करून मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगलागौरीचे आवाहन करावे. यानंतर षोडशोपचारे पूजा करावी. काही ठिकाणी देवीला कणकेचे अलंकार वाहण्याची पद्धत आहे. नंतर देवीची अंगपूजा करुन देवीला विविध पत्री, फुले वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ इ. धान्ये मूठीने अर्पण करावीत. धूप-दीप-नैवेद्य अर्पण करावा. षोडशोपचार पूजा झाल्यावर सर्व प्रकारच्या संपत्ती प्राप्ती, दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य प्राप्ती व सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरिता देवीला तीन अर्घ्य द्यावीत. यानंतर मंगळागौरीची कहाणी वाचावी. देवीला विविध पक्क्वान्नांनी युक्त महानैवेद्य अर्पण करुन कणकेच्या सोळा दिव्यांनी व काडवातींनी आरती करावी. सायंकाळी पुन्हा देवीची आरती करून देवीसमोर पारंपारिक खेळ खेळून जागरण करावे. लग्नानंतर सलग 5 वर्षे मंमंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे.

मंगळागौरी पूजनाचे महत्व

नवविवाहितेच्या वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण व्हावे, अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभावी, म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची प्रथा आहे. लग्नानंतर आईने मुलीला दिलेले 'सौभाग्य व्रत' म्हणून मंगळागौरीला ओळखले जाते. मंगळागौरी व्रताचे पालन केल्याने पतीचे आयुष्य दीर्घ होते. अविवाहित महिला देखील चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात. हे व्रत वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी आणि कुटुंबात सुख-शांती नांदावी यासाठीही पाळले जाते. पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते. ज्यांना संतती नाही त्यांनी मंगळागौरीचे व्रत केल्यास त्यांना संततीचे सुख प्राप्त होते असे म्हटले जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com