Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाही? जाणून घ्या...

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाही? जाणून घ्या...

भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दिसणे किंवा पाहणे अशुभ मानले जाते.
Published by :
Team Lokshahi

भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दिसणे किंवा पाहणे अशुभ मानले जाते. पौराणिक कथेनुसार गणेशाच्या गाजमुखाला चंद्र हसला होता, त्यामुळे भगवान गणेशाने चंद्राला शाप दिला होता, ज्यामुळे चंद्राने त्याचा चंद्रप्रकाश गमावला होता. असे म्हणतात की या दिवशी चंद्राकडे पाहिल्यास माणसावर खोटा कलंक लागतो. असे असताना जर एखाद्याला चुकून चंद्र दिसला तर काय करावे? जाणून घ्या-

एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असतात तेव्हा ते घसरतात आणि त्यांना बघून चंद्र हसू आवरत नाही. हे बघून गणपतीला चंद्राचा फार राग येतो. गणपती चंद्राला शाप देतात की "आजपासून तुझे कोणी तोंड देखील पाहणार नाही. जो कोणी तुझं तोंड पाहील त्यावर खोटा आळ येईल!" यावर चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस "भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी" तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले.

त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? तेव्हा गणपतीने सांगितले की, त्याने संकष्ट चतुर्थी व्रत" करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. एक कथेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्या मुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने "संकष्ट चतुर्थी व्रत" केल्यामुळे गेला. श्री गणेश चतुर्थीला ‘कलंकित चतुर्थी’ असेही म्हणतात. या चतुर्थीला चंद्र पहाणे वर्जित आहे. चुकूनही चतुर्थीचा चंद्र दिसल्यास ‘श्रीमद्भागवता’च्या दहाव्या स्कन्दातील ५६-५७ व्या अध्यायात दिलेली ‘स्यमंतक मण्याची चोरी’ ही कथा आदराने वाचली किंवा ऐकली पाहिजे. भाद्रपद शुक्ल तृतीयेचा किंवा पंचमीचा चंद्र पहावा. यामुळे चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यास त्याचा अधिक धोका रहात नाही. चुकून चंद्रदर्शन झाल्यास या मंत्राने अभिमंत्रित केलेले पवित्र जल प्राशन करावे.

सिंहःप्रसेनमवधीत्, सिंहो जाम्बवता हतः।

सुकुमारक मा रोदीस्तव, ह्येष स्यमन्तकः।।

या मंत्राचा २१, ५४ किंवा १०८ वेळा जप करावा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com