मी माझ्या बाबांना वचन दिलं होतं की कधीही…” सचिन तेंडुलकरनं सांगितले...
मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर झाले आहेत. सचिन तेंडुलकर हे या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे काम करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिन तेंडुलकर, गिरीष महाजन, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. आज याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना सचिन तेंडुलकरनं त्याच्या वडिलांची एक आठवण सांगितली आहे. सचिन तेंडुलकर म्हणाला की, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतातच. सरकारनं खूप चांगलं काम केलंय या पुढाकारातून. पहिली इनिंग सरकारनं खेळली आहे. आता दुसरी इनिंग लोकांना खेळायची आहे. असे तेंडुलकर म्हणाला.
यासोबतच वडिलांची आठवण सांगताना सचिनने सांगितले की, मी भारतासाठी जेव्हा पहिल्यांदा खेळलो, तेव्हा माझं वय १६ होतं. भारतासाठी खेळायला लागलो, काही जाहिरातीही केल्या. पण तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की तू तंबाखूची जाहिरात कधीच करणार नाहीस. मी बाबांना तेव्हा वचन दिलं होतं की कितीही काहीही झालं तरी मी तंबाखूची जाहिरात करणार नाही.
मला तंबाखू उत्पादक कंपन्यांनी विचारणा केली होती. मोठ्या रकमांच्या ऑफर्स दिल्या होत्या. काहींनी तर ब्लँक चेक्सही दिले होत. मात्र आता मी गर्वाने म्हणू शकतो की मी तंबाखूशी कोणत्याही प्रकारे संबंधित नव्हतो. मला माहिती आहे की माझे बाबा वरून माझ्याकडे बघत असतील आणि ते या क्षणी खूश असतील. असे सचिन तेंडुलकर म्हणाला.