सांगलीच्या लेकीनं मैदान गाजवलं! प्रतिक्षा बागडी ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'

सांगलीच्या लेकीनं मैदान गाजवलं! प्रतिक्षा बागडी ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'

महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात पहिल्यांदाच राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीमध्ये पार पडल्या.

संजय देसाई | सांगली : महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात पहिल्यांदाच राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीमध्ये पार पडल्या आहेत. या स्पर्धेमध्ये सांगलीच्या प्रतीक्षा बागडी हिने बाजी मारली आहे. आणि पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान प्रतिक्षाने मिळवला आहे. लपेट डावावर प्रतीक्षा बागडीने कल्याणच्या वैष्णवी पाटील हिला चितपट करत बाजी मारली. या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी विजेत्यास यावेळी चांदीची गदा, महाराष्ट्र केसरी किताब आणि रोख 51 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा तालीम संघाने सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी मॅटवरील कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या. 45 किलो वजनी गटापासून 76 किलो वजनी गटात या कुस्त्या स्पर्धा संपन्न झाल्या. सर्व गटात अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीच्या कुस्त्या पार पडल्या. महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीची प्रतीक्षा बागडी आणि कल्याणच्या वैष्णवी पाटील यांच्यात अंतिम लढत झाली.

यामध्ये प्रतीक्षाने लपेट डावावर वैष्णवीला अवघ्या दोन मिनिटात चितपट करत विजय मिळवला आहे आणि पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताब हा सांगली जिल्ह्याला मिळवला आहे. महिला महाराष्ट्र केसरी विजेत्या प्रतीक्षा बागडी हिला सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांच्या व मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा, महाराष्ट्र केसरी किताब आणि रोख 51 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com