वसई कला-क्रीडा महोत्सवा दरम्यान दुर्घटना; 15 जण जखमी

वसई कला-क्रीडा महोत्सवा दरम्यान दुर्घटना; 15 जण जखमी

वसईत शुक्रवारी संध्याकाळी खो-खोच्या सामन्यादरम्यान मैदानावर उभारलेली तात्पुरती प्रेक्षक गॅलरी कोसळली.
Published by :
Team Lokshahi

वसईत शुक्रवारी संध्याकाळी खो-खोच्या सामन्यादरम्यान मैदानावर उभारलेली तात्पुरती प्रेक्षक गॅलरी कोसळली. या घटनेत 15 जणांना किरकोळ दुखापत झाली. जखमी झालेल्यांमध्ये बहुतांश प्रेक्षक तसेच तरुणांचा समावेश आहे. येथे 27 ते 31 डिसेंबर दरम्यान वसई तालुका कला क्रीडा महोत्सव सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. जखमी खेळाडू आणि प्रेक्षकांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. बहुतांश जखमी महिला खेळाडू होत्या. हे सर्व विरार मधील चिखल डोंगरी आणि अर्नाळा गावातील होते.

वसई विरार महापालिका आणि वसई कला क्रीडा महोत्सवाच्या वतीने वसईच्या चिमाजी अप्पा मैदानावर 34 वा कला क्रीडा महोत्सव सुरू आहे. शुक्रवारी या कला क्रीड महोत्सवाचा 4 था दिवस होता. मैदानावर विविध खेळांचे सामने रंगले होते. खो-खो सामन्याच्या वेळी उभारण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीत दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते.

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर तसेच भाजपाचे नेते मनोज पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. खो-खो चा सामना रंगतदार होता. त्यामुळे उत्साहात क्षमतेपेक्षासमर्थक प्रेक्षक गॅलरीत चढले. त्यामुळे ही दुर्घटना घडली, असे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी सांगितले. आजवर महोत्सवात अशी दुर्घटना कधी घडली नव्हती. परंतु यापुढे आम्ही आयोजनात अधिक काळजी घेऊ असेही शेट्टी यांनी सांगितले. दुर्घटनेंतर महोत्सवातील इतर सामने सुरळीत सुरू होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com