African Swine Fever : आफ्रिकेन स्वाईन फिव्हरमुळे महाराष्ट्रातील 'हा' जिल्हा हादरला; पशुसंवर्धन विभागाची मोठी कारवाई
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता–साकुरी परिसरात डुक्करांचे अचानक मृत्यू होऊ लागल्याने संशय निर्माण झाला होता. नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर हे मृत्यू आफ्रिकन स्वाईन फिव्हरमुळे झाल्याचं स्पष्ट झालं आणि संपूर्ण भागात खळबळ उडाली आहे.
राहाता परिसरात सतर्कता वाढवली
या प्राणघातक आजाराचे काही रुग्ण डुक्करांमध्ये आढळताच पशुसंवर्धन विभागाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. राहाता आणि साकुरी परिसरातील एक किलोमीटरच्या मर्यादेतील सर्व डुकरांना पकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने नष्ट करण्यात येत आहे. हा रोग माणसांमध्ये किंवा इतर प्राण्यांमध्ये पसरत नाही, तरीही खबरदारीच्या दृष्टीने डुक्कराचे मांस खाणे टाळावे असा सल्ला देण्यात आला आहे.
15 दिवसांपूर्वी सुरू झालेली मृत्यूची मालिका
राहाता तालुक्यात गेल्या काही दिवसांत डुकरांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटना घडल्या. त्यांचे नमुने भोपाळ प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. तपासणीत आफ्रिकन स्वाईन फिव्हरची पुष्टी झाली असून, आतापर्यंत 16 डुक्करांना नियमांनुसार ठार करून विल्हेवाट लावण्यात आली आहे.
स्वाईन फिव्हर आणि स्वाईन फ्लू – नेमका काय फरक?
स्वाईन फिव्हर हा फक्त डुकरांमध्ये होणारा रोग आहे.
त्याचा माणसांवर कोणताही परिणाम होत नाही.
मात्र, आजारी डुकरांचे मांस खाणं टाळावं, अशी सूचना देण्यात आली आहे.
साकुरी गावातही रोगाचा शिरकाव
साकुरी गावातही गेल्या काही दिवसांत डुकरांचे अनैसर्गिक मृत्यू होत असल्याने नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. भोपाळ येथील लॅबने **सॅम्पल पॉझिटिव्ह** असल्याची खात्री दिल्यानंतर पशुवैद्यकीय पथक गावात दाखल झाले आहे. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने डुक्करांची विल्हेवाट लावण्याची मोहीम आता अधिक वेगाने राबवली जात आहे.
नागरिकांना आवाहन
पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केलं आहे की हा आजार मानवी आरोग्यास धोकादायक नाही, तरीही, साकुरी परिसरातील किंवा जिल्ह्यातील इतर गावांमध्ये **डुकरांचे अचानक मृत्यू आढळल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त मुकुंद राजळे यांनी केलं आहे.

