'एमएमआरडीएच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करावं'

'एमएमआरडीएच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करावं'

राष्ट्रवादी उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

अमझद खान | ठाणे : जिल्ह्यातील उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण डोंबिवली अशा छोट्या शहरांचा विकास गतीने करण्यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी देखील स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच, महापालिका क्षेत्रातील टिटवाळा येथे मेडिकल कॉलेजसाठी आरक्षित असलेला भूखंडावर मेडिकल कॉलेज तात्काळ मंजूर करा व त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत दिली

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. हिंदुराव हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. त्यामुळे राज्यात नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले असले तरी या भेटीत राजकीय नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आल्याचे हिंदुराव यांनी सांगितले.

याबाबत हिंदुराव यांनी एमएमआरडीएचा पैसा फक्त मुंबईसाठी खर्ची केला जातो. ठाणे, कल्याण डोंबिवली, पालघर, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरे विस्तारत आहेत. या शहरांचा जलदगतीने विकास करण्यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे. जेणेकरून पायाभूत सुविधा, रस्ते, ड्रेनेज,सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, दळण वळण, पाणी पुरवठा आदी महत्वाच्या बाबींचा जलद विकास करणे सोपे जाईल, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याने विविध ठिकाणी मेडिकल कॉलेजची परवानगी दिली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मेडिकल कॉलेजसाठी आरक्षित असलेला टिटवाळा येथे भूखंड आहे. राज्य सरकारने या ठिकाणी मेडिकल कॉलेज तत्काळ मंजूर करावं व महापालिकेने आरक्षित जागा त्या कामासाठी वापरावी यासाठी मुख्यमंत्री म्हणून पाठपुरावा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली असल्याची माहिती हिंदुराव यांनी दिली.

यावेळी रमेश हनुमंते, रेखा सोनावणे आणि प्रसाद महाजन हेदेखील उपस्थित होते. तसेच, माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाच्या उभारणीकरीता निधीची तरतूद केली होती. प्रकल्पासाठी एकूण 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 400 कोटीचा हिस्सा राज्य सरकारकडून खर्च केला जाणार आहे. तो तात्काळ उपलब्ध करुन द्यावा याकडेही हिंदूराव यांनी मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com