तरुणीने विवाहाला नकार दिल्याचा राग; तरुणाने सात वाहनांची केली जाळपोळ
महेश महाले | नाशिक : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने त्याच्या साथीदारासह तब्बल सात वाहने पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली. नाशिकच्या काठे गल्ली परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. यात फिर्यादी तरुणीच्या दोन गाड्या आणि इतर पाच अशा सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेत वाहने जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. या घटनेप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघांना अटक केले.
या घटनेतील फिर्यादी तरुणी आणि संशयित सुमित पगारे यांची ओळख आहे. संशयित पगारे याने फिर्यादी तरुणीला सातत्याने विवाह करण्याचा तगादा लावला. तरुणीने यास नकार दिल्याने संशयित पगारे यास राग आला. त्याने सहकारी संशयित विकी जावरे (रा. काठेगल्ली) याच्या मदतीने तरुणीच्या दुचाकीसह अन्य दुचाकी, चारचाकी वाहन आणि रिक्षाची जाळपोळ केली. स्थानिक रहिवाशांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बहुतांशी वाहने जळून राख झाली होती. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.