भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचं आज अनावरण

भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचं आज अनावरण

भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचं आज अनावरण होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचं आज अनावरण होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुधीर मुनगंटीवार श्रीनगरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. आज शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडेदहा फुट उंचीचा आहे.आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकारानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मीरमधील कुपवाडा येथे उभारण्यात आला आहे. साडेदहा फुट उंची, तेवढ्याच उंचीचा चौथरा तयार करण्यात आला आहे.

कुपवाडा येथे होत असलेल्या या कार्यक्रमात वीर पत्नींना सन्मानित करण्यात येणार असून वीर शहीद कर्नल संतोष महाडिक यांना अभिवादन करण्यात येईल. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय रायफल्स-41 चे जवान अतिशय उत्साहित असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. मागील आठवड्यात हा पुतळा जेव्हा या परिसरात दखल झाला तेव्हा जवानांनी ढोल ताशे आणि झांज वाजवून जल्लोषात स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री. रमेश बैंस यांच्या हस्ते व मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे, सांस्कृतिक कार्ये मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दि. २० ऑक्टोबर रोजी राजभवन येथे झाल्यानंतर हा पुतळा कुपवाडाच्या दिशेने रवाना झाला होता.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार तसेच महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यातून “आम्ही पुणेकर” या संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात येत आहे. “आम्ही पुणेकर” संस्थेचे अध्यक्ष श्री हेमंत जाधव आणि विश्वस्त श्री अभयराज शिरोळे हे यांच्यासह त्यांच्या सदस्यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाला सर्वतोपरी सहाय्य केले जाईल असे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले होते.

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष श्री अभयराज शिरोळे यांच्या हस्ते दि. २० मार्च २०२३ रोजी पार पडले होते. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला गेला आहे. सदर संस्थेतर्फे कुपवाडा येथे भारतीय सैन्यासोबत विविध दीर्घकालीन उपक्रम प्रस्तावित आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com