Lokshahi Impact | यवतमाळमधील 17 वर्षीय युवतीचं मृत्यूप्रकरण; डॉ. गुप्तांची हकालपट्टी

Lokshahi Impact | यवतमाळमधील 17 वर्षीय युवतीचं मृत्यूप्रकरण; डॉ. गुप्तांची हकालपट्टी

सतरा वर्षीय मुलीचा व्हेंटिलेटर अभावी झाला होता मृत्यू

नागपूर : यवतमाळ मधील सतरा वर्षीय मुलीचा व्हेंटिलेटर अभावी नागपूरच्या शासकीय मेडिकल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याचा प्रकरण लोकशाही माध्यमाने उचलून धरलं होतं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपूर मेडिकलचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर गुप्ता यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यासंबंधी आदेशही काढण्यात आला आहे.

आर्णी तालुक्यातील एका युवतीचा नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये व्हेंटिलेटरअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अंबु बॅगद्वारे कृत्रिम श्वास पुरवठा करून तिला जगवण्यासाठी पालकांनी 24 तास आटापिटा केला होता. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेर मुलीने व्हेंटिलेटर अभावी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला होता.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत अधिष्ठता डॉक्टर गुप्ता यांच्यविरोधात चौकशी समिती नियुक्त केली होती. त्याचवेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर दिलीप म्हैसाळकर यांनीही स्वतंत्र चौकशी समिती नेमली. या दोन्ही समितीचे अहवाल याच आठवड्यात सादर झाले. यानुसार अधिष्ठाता डॉक्टर सुधीर गुप्ता यांना दोषी धरत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, व्हेंटिलेटर प्रकरणाशिवाय डॉक्टर गुप्ता यांच्या विरोधात इतरही अनेक तक्रारी होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com