Ravindra Dhangekar : पुण्यात रविंद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ वाद पेटला; मोहोळ यांच्यावरील गुन्ह्यांची यादी आणली समोर
(Ravindra Dhangekar) शिवसेनेचे रविंद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहार प्रकरणात शिवसेनेचे रविंद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.त्यांच्या या भूमिकेमुळं भाजप नेत्यांकडून तक्रार करण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रविंद्र धंगेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यातच आता रविंद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर नवा आरोप केला आहे. महापौर असताना मोहोळ जैन बोर्ड जमिन व्यवहार प्रकरणाशी संबंधित असलेल्या बढेकर बिल्डरची गाडी वापरायचे असा आरोप धंगेकर यांनी केला. त्यानंतर यावर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, बोगस कार्यक्रम चालला आहे. मला काही उत्तरे द्यायची नाही. त्यांचे अनेक विषय बाहेर येत आहेत. त्यांच्यावर दहा गुन्हे आहेत माझ्यावर एक गुन्हा दाखवा. मला या माणसाबद्दल काही बोलायचं नाही".
याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा रविंद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावरील गुन्ह्यांची यादी समोर आणली आहे. माध्यमांसमोर बोलताना मोहोळ यांनी माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही आणि धंगेकर यांच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत, असं विधान केलं होतं. त्यावर आता रवींद्र धंगेकरांनी मोहोळवर किती आणि कोणते गुन्हे दाखल आहेत, हे समोर आणलं आहे. मोहोळ हे किती खोट बोलतात याचं उदाहरण देत धंगेकरांनी पुन्हा मुरलीधर मोहोळ यांना घेरलंय.
रविंद्र धंगेकर ट्विट करत म्हणाले की, अतिशय सुसंस्कृत व सरळमार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ हे कशा पद्धतीने खोटे बोलतात याचे उदाहरण मी तुम्हाला देतो. काल माध्यमांशी बोलताना त्यांनी सरळ सांगितले की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही. मी या ट्विट सोबत आपल्याला त्यांच्या इलेक्शन एफिडेविट मधील पानांची कॉपी जोडतोय त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते कशाकशा संदर्भात आहेत अगदी ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल आहे.
मला माहित आहे, राजकीय कार्यकर्ता म्हटलं की गुन्हे असतात. काही हेतूपरस्पर केलेले असतात काही आंदोलनातले असतात. परंतु केवळ बदनामी करण्यासाठी माझ्यावर 13 केसेस आहेत आणि त्यांच्यावर एकही नाही असं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण त्या प्रेसची सुद्धा फसवणूक करत असतो आणि तमाम पुणेकरांची देखील फसवणूकच करत असतो, हे एका केंद्रीय राज्यमंत्री व खासदाराला अशोभनीय आहे बाकी जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरणे घेऊन लवकरच भेटुयात..! असे देखील धंगेकर यांनी म्हटले आहे.
