Sudhakar Badgujar Nashik : नाशिकच्या राजकारणातील मोठी घडामोड, भाजप प्रवेशाआधी सुधाकर बडगुजर यांचं जोरदार शक्तिप्रदर्शन
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा इन-आऊटचा खेळ सुरू झाला असून, ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत मोठ्या थाटात पार पडणार असून, हा प्रवेश केवळ औपचारिक नसून, एकप्रकारचे शक्तिप्रदर्शन ठरणार आहे.
बडगुजर यांच्यावर स्थानिक पातळीवर काही विरोध असतानाही भाजपकडून या प्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय ताकदीची दखल घेतली गेली, असे स्पष्ट होते. त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम भाजप कार्यालयात दुपारी 1 ते 2 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. बडगुजर यांच्या प्रवेशामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणांमध्ये नवे वळण येण्याची शक्यता आहे.
भाजपसाठी 'स्ट्रॅटेजिक गेन'
हा प्रवेश केवळ एक नेता सामील होण्यापुरता मर्यादित नसून, तो भाजपसाठी नाशिक विभागातल्या आगामी राजकीय चाचपणीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. सुधाकर बडगुजर यांच्या उपस्थितीत भाजपला स्थानिक पातळीवर अधिक बळकटी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय चर्चांना उधाण आलेल्या या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात नाशिकमधील राजकारणात भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.