कुठं जाळपोळीचं ऐकायला मिळालं नाही पाहिजे अन्यथा 24 तासात मी वेगळा निर्णय घेईल; जरांगेंचा इशारा
जालना : बीडमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करत मराठा आंदोलक आक्रमक झाले असून परिस्थिती चिघळत चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या राहत्या बंगल्याला आंदोलकांनी आग लावाली आहे. तर, याआधी शरद पवार गटाचे कार्यालय आणि प्रकाश सोळंके यांचेही घर जाळण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी संवाद साधत शांततेचे आवाहन केले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सगळ्या मराठा समाजाला सांगितले होते साखळी उपोषण आणि आमरण उपोषण करा. समाज १०० टक्के शांततेने आंदोलन करत आहे. मी जे सांगत आहे ते माझा गोरगरीब समाज करत आहे, जाळपोळ करू नका, उद्रेक करू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. हे कोण करते आम्हाला माहित नाही. मात्र, आज रात्री आणि उद्या कुठं जाळपोळ आणि नेत्याच्या घरी गेल्याचे ऐकायला मिळालं नाही पाहिजे अन्यथा चोवीस तासात मी वेगळा निर्णय घेईल, असा इशाराच जरांगेंनी दिला आहे. तसेच, माझं जाळपोळीला समर्थन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्ताधारी लोकं हे त्यांच्याच हाताने जाळून घेत असून मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावत आहेत. जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केले आहे. सत्ताधाऱ्यांनी दुप्पट जरी धिंगाणा केला तरी मी उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच, मला त्रास होईल असे वागू नका, मला त्रास होणार नाही याची समाजाने काळजी घ्यावी. जाळपोळ करणारे कुणीही असो,
बीड बंद हा शांततेत असू शकतो. तुम्ही कुणाचेही असो तुम्हाला माझी कळकळीची विनंती आजपासून जाळपोळ बंद करा. आपण कुणाच्या दरात जायचं नाही आणि ते आले तर पाहू. मराठा समाजाला जर वाटत असेल की माझी तब्येत खराब झाली असून ते असे करत असेल तर मी पाणी पितो. मात्र, राज्यात शांतता ठेवा. परंतु, आमरण उपोषण सुरूच राहणारअ असून मी शांतता कायम राहावी यासाठी प्रयत्न करेल, असे त्यांनी म्हंटले आहे.
सर्व नेते मराठा आरक्षणासाठी मुंबईला जात आहेत ही आनंदाची बाब आहे. गैरसमज करायचं नाही. छाती ठोकून सांगितलं अर्ध आरक्षण नको, सरसकट आरक्षण द्या. तुम्ही फक्त मराठवाड्याला आरक्षण दिले तर मी मोठं आंदोलन करेल. अर्धवट आरक्षण दिल्यास आम्ही ते फेकून देऊ, असेही मनोज जरांगे पाटलांनी म्हंटले आहे.