वरळीत गॅस सिलेंडरचा स्फोट, 4 महिन्यांच्या बाळासह 4 जण जखमी

वरळीत गॅस सिलेंडरचा स्फोट, 4 महिन्यांच्या बाळासह 4 जण जखमी

Published by :

मुबंईतील वरळी येथे आज, मंगळवारी सकाळी ७.११ वाजताच्या सुमारास कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर आगीचा भडका उडाला. यात चार जण होरपळून जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी येथील कामगार वसाहत येथील बीबीडी चाळ क्रमांक ३ मध्ये एका घरात आज, मंगळवारी सकाळी ७.११ वाजताच्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर घराला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल आणि पोलीस तसेच वॉर्डातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाकडून सकाळी ९.४४ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही आग आता आटोक्यात आणण्यात आली आहे.

या आगीच्या घटनेत ४ जण जखमी झाले आहेत. त्यांना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आनंद पुरी (वय २७), मंगेश पुरी (४ महिने), विद्या पुरी (वय २५ वर्षे), विष्णू पुरी (वय ५) अशी जखमींची नावे आहेत. यातील चार महिन्यांचे बाळ आणि आनंद पुरी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर विद्या पुरी आणि विष्णू पुरी या दोघांची प्रकृती स्थिर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com