IndiGo Airlines : इंडिगोच्या गोंधळाबाबत मुरलीधर मोहोळांचे मोठे विधान, म्हणाले...
गेल्या चार ते पाच दिवसांपासून इंडिगो (IndiGo) एअरलाइन्सची सेवा विस्कळीत झाल्याने पुणे विमानतळावर प्रवाशांचा मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी इंडिगोची पुण्यात येणारी २१ आणि येथून जाणारी २१ अशी एकूण ४२ उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या विस्कळीत सेवेचा गैरफायदा घेत इतर कंपन्यांनी तिकीट दर तिप्पट वाढवले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी या सर्व घटनेबाबत भाष्य केलं आहे.
त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे
तर, इंडिगो देशातली 65 टक्के विमानसेवा देते. आधीच पायलटची कमतरता आणि त्यातून ड्युटीचे तास दोन तासांनी कमी झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. भारत सरकारने या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. इंडिगोला सगळी सिस्टीम रेग्युलेट करण्यास थोडा वेळ लागेल म्हणून त्यांना थोडी मुदत दिली आहे. 4 सदस्यीय चौकशी समिती त्यासंदर्भात नेमली आहे. डीजीसीएने इंडिगोच्या प्रमुखांना नोटिस पाठवली आहे. इतर विमान कंपन्यांच्या किमतींवर कॅप लावली आहे.
शिवाय ज्यांची विमानं रद्द झाली, त्यांना संपूर्ण रिफंड ४८ तासांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. ४ सदस्यीय चौकशी समितीच्या रिपोर्टमध्ये जे काही येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल. कालपासून परिणाम थोडा-थोडा कमी व्हायला लागला आहे. पुणे विमानतळावरून इंडिगोच्या ५७ विमानसेवा होत्या. त्यातील आज ३७ विमानसेवा सुरू झाल्या आहेत. मात्र आधीच्या चुकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देखील मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.

