Wardha: ट्रक चालकाचे बिंग फुटले, चण्याच्या पावतीवर रेशनचे तांदूळ आढळले!

Wardha: ट्रक चालकाचे बिंग फुटले, चण्याच्या पावतीवर रेशनचे तांदूळ आढळले!

सिंदी पोलिसांची कारवाई ; 34 लाखाचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल
Published by  :
Team Lokshahi

भूपेश बारंगे,वर्धा : वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गवरून दिवसाढवळ्या चण्याच्या पावतीचा आडोसा घेत चक्क तांदळाची नियमबाह्य वाहतूक केली जात असल्याचे पोलीस कारवाईत उघड झाले. पोलिसांनी समृद्धी महामार्गवर नाकाबंदी करून ट्रकसह 34 लाख 25 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ट्रकच्या चालकासह क्लिनरला अटक करण्यात आली. ही कारवाई सिंदी रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गाने नियमबाह्यरित्या तांदळाची मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली. यावेळी ट्रकला थांबवून विचारपूस केले असता ट्रक चालकाने ट्रकमध्ये चणा भरून असल्याचे सांगितले. त्याने चणा लिहीलेली पावतीही पोलिसांना दाखविली. मात्र पोलिसांनी ट्रकची तपासणी करताच ट्रक चालकाचे बिंग फुटले. या ट्रकमध्ये चणा नसून रेशन धारकाचे तांदूळ भरलेले पोते आढळून आल्याने पोलिसांच्याही भुवया उंचावल्या.

ट्रक क्रमांक महा 40 सीडी 6709 हा ट्रक मालेगाववरून नागपूरकडे जात होता. या ट्रकमध्ये प्लास्टिकच्या 644 पोत्यांमध्ये तांदूळ आढळून आले. यामध्ये 257 क्विंटल तांदूळ आढळून आला. याची किंमत 9 लाख 25 हजार 200 रुपये एवढी आहे. पोलिसांनी एकूण 34 लाख 25 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईमध्ये मुख्य आरोपी आझाद पठाण रा.मालेगाव, ट्रक चालक पवन चारमोडे, क्लिनर अनुप तितरमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनूने, मनोहर चांदेकर, उमेश खामनकर, सचिन उईके, रवी मोरे, आकाश वालदे, शालू नेहारे यांनी केली आहे. पुढील तपास सिंदी पोलीस करत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com