Prakash Ambedkar : वैदिक परंपरा विषमतावादी, तर संतांची परंपरा बंधुत्वाची

Prakash Ambedkar : वैदिक परंपरा विषमतावादी, तर संतांची परंपरा बंधुत्वाची

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या संविधान निर्धार सभेत केले.
Published by :
Siddhi Naringrekar

एका बाजूला इथे वैदिक परंपरा आहे ती विषमतावादी आहे आणि दुसऱ्या बाजूला संतांची परंपरा आहे ती बंधू भावाची असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या संविधान निर्धार सभेत केले. अशोक चक्रासोबतचा तिरंगा मान्य करणे. 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून मान्य करणे. आणि भारतीय राज्यघटनेला मान्य करणे. अशा तीन अटी सरदार पटेल यांनी आरएसएसला घातल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, आरएसएसने १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा केला, पण १५ ऑगस्ट हा दिवस साजरा केला नाही. आरएसएस राज्यघटना मानत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आम्हाला संधी मिळाली की आम्ही राज्यघटना बदलू असे आरएसएसने त्यावेळी जाहीर केल्याचा इतिहास त्य़ांनी सांगितला.

कोणतीच व्यवस्था हवेतून येत नाही. ती समाजातचं रुजेलेली असते. ज्या व्यवस्थेतून एक नवीन जीवन मार्ग सुरू झाला त्या व्यवस्थेचे नाव संविधान आहे. ७० वर्षानंतर जर आपल्याला संविधान निर्धार सभा घ्यावी लागतं असेल तर, याचा अर्थ असा की, हे संविधान अजून समाजात रुजले नसल्याची खंत त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. आपलं चुकलं कुठे ? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी म्हटले की, एकेकाळी एका उच्च पातळीवर असणारी समाजवादी आणि मार्क्सवादी विचारधारा, आत्ताच्या नव्या पिढीला आकर्षित करू शकलेली नाही. तिथेच आपली गाडी चुकलेली आहे. इथे एक नवा संघर्ष उभा राहत आहे. आपण म्हणतोय की, आम्ही संविधानाच्या बाजूने आहोत, दुसरीकडे संविधान बदलू पाहणारे आहेत. या नव्या संघर्षाला तोंड द्यायचं असेल तर, संविधानाची चर्चा करत असताना धर्माची चिकित्सा देखील करावी लागेल. याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

धर्माची चिकित्सा ही पँथर स्टाईल न करता, वैचारिक आणि तात्विक चर्चा यावर व्हायला हवी असे मत त्यांनी यावेळी मांडले. एकीकडे विषमतावादी व्यवस्थेचे पुरस्कर्ते आहेत तर, दुसरीकडे समतावादी व्यवस्थेचे पुरस्कर्ते आहेत. लोकांनी कुठे जायला पाहिजे ते आता ठरवले पाहिजे. असेही त्यांनी सांगितले. समतेवर आधारित व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. भाजप आणि आरएसएसला जर दोन तृतीयांश बहुमत मिळाले, तर ही व्यवस्था ते बदलण्याची शक्यता आहे. आपण निर्माण केलेल्या व्यवस्थेवरील हल्ला थांबवायचा असेल तर, ते दोन तृतीयांश बहुमत मिळवणार नाहीत याची दक्षता घ्यायला हवी. यासाठी चार राज्ये महत्वाची आहेत प. बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मोदींनी कुटुंब की चळवळ अशी व्यवस्था निर्माण केली आहे. आपण चळवळ म्हटल की, कुटुंब जेल मध्ये जाईल आणि आपण कुटुंब म्हटल तर चळवळीचा बळी जाईल. अशा परिस्थितीत आपल्याला वेगळी यंत्रणा उभी करून सामान्य माणसांना मार्गदर्शन करावं लागेल. असा सल्ला त्यांनी यावेळी चळवळीतील कार्यकर्त्यांना दिला.यावेळी, डॉ. बाबा आढाव, आमदार शिरिष चौधरी, आमदार कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com