पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीवर बिनबुडाचे आरोप करू नये - सिद्धार्थ मोकळे

पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीवर बिनबुडाचे आरोप करू नये - सिद्धार्थ मोकळे

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत सहभाग का होत नाही?
Published by :
Siddhi Naringrekar

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत सहभाग का होत नाही? याबाबत उलटसुलट विधाने केली आहेत. वंचित बहुजन आघाडीवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. त्याला मी राजकिय भडवेगीरी म्हणतो. ती राजकीय भडवेगीरी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. असा घणाघाती पलटवार वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केला.

आज त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, वंचित बहुजनांचा मोठा समूह घेऊन व्यवस्थेने नाकारलेल्या, सत्तेच्या बाहेर फेकलेल्यांचा एकत्रित पक्ष उभा करून बाळासाहेब आंबेडकर त्यांना राजकारणात आणतात आणि सत्तेकडे कूच करतात. समोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपासारख्या बलाढ्य शक्ती आहेत त्यांना न घाबरता हिंमतीने, ताकदीने, थेट अचूकपणे आणि परखडपणे त्यांच्यावर टीका कोण करत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर हे आहेत.

इंडिया आघाडीची मोट बांधली गेली आहे. भाजपच्याविरोधात लढण्यासाठी त्यात आम्ही सहभागी होऊ इच्छितो. सगळ्या पक्षांनी एकत्रित येऊन भाजपला रोखलं पाहिजे ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी अशी भूमिका बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने घेतली. सातत्याने वेगवेगळ्या माध्यमांतून आम्ही ती भूमिका काँग्रेसपर्यंत पोहचवली. सभा, मीडिया आणि शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका पोहचवली. यावर महाराष्ट्रातील नेत्यांनी ज्या काही कोलांट्या उड्या मारल्या त्या सगळ्या आपण बघितल्या आहेत.

ज्या पक्षाने २०१९ मध्ये आपली ताकद दाखवली आहे. २०१९ नंतर ज्या पक्षाची ४४ लाख मतांची संख्या आज कैकपटीने आपल्याला वाढलेली दिसत आहे. ज्या पक्षाची आज गावपातळीवर वॉर्डपर्यंत पक्ष बांधणी आहे. आणि ज्या पक्षाची कसलीही राजकीय हवा नसताना, भावनिक लाट नसताना, निवडणुकी नसताना लाखांच्या सभा होत आहेत. एकही रुपया न देता लाखों लोक सभेला येत आहेत. तर अशा बलशाली पक्षाला इंडिया आघाडीत घेण्यापासून तुम्हाला कोण रोखत आहे? असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी 2 वर्षांपूर्वी भाजपमध्ये जाण्यासाठी कॉल केला होता की नाही याचं उत्तर आधी द्यावे. असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com