Maharashtra Municipal Election : मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने नेमके काय सांगितले?
राज्यात मुंबई महानगपालिका निवडणुकीची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. कधी या निवडणुकीची होणार, याची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीची कधीही घोषणा होण्याची शक्यता लक्षात घेता राज्यातील सर्वच महत्त्वाचे पक्ष कामाला लागले होते. शिवसेनेचा शिंदे गट आणि ठाकरे गट आणि भाजपा या तिन्ही पक्षांसाठी ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची आहे. त्यामुळेच काहीही झालं तरी ही निवडणूक जिंकायचीच असा प्रणच या पक्षांनी केला आहे. दरम्यान, ही निवडणूक कधी लागते, असे विचारले जात असतानाच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मुंबई पालिकेच्या निवडणुकीची तारखी अखेर जाहीर केली आहे. आता मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार 15 जानेवारी 2026 या तारखेला होणार असून निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे.
मुंबईत 11 लाख दुबार मतदार
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदारांना एकच मत द्यावे लागेल. मुंबईत सोबतच एकूण 10 हजार 111 मतदार केंद्र असतील. मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार आढळले आहेत. तुम्ही नेमकं या मतदारांना कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार, असे विचारण्यात येईल. तसेच या दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार असे नमूद असेल.
निवडणूक आयोगाने नेमके काय सांगितले?
मुंबई पालिकेच्या निवडणुकीची घोषणा आज (15 डिसेंबर) राज्य निवडणूक आयोगाने अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन केली आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान या घोषणेनुसार आता 15 जानेवारी या तारखेला होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 या तारखेला मतमोजणी केली जाईल. निकालही याच दिवशी घोषित केला जाईल. निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 या काळात अर्ज करता येतील. 2 जानेवारी 2026 या तारखेपर्यंत तर उमेदवारांनाअर्ज मागे घेता येतील. निवडणूक आयोग 31 डिसेंबर 2025 या तारखेपर्यंत अर्जांची छाननी करेल.
मुंबईत कोण मारणार बाजी?
मुंबईत ही निवडणूक एकूण 227 जागांसाठी आयोजित केली जाईल. या सर्व जागा जिंकण्यासाठी तसेचआपलाच विजय मुंबई महापालिका निवडणुकीत व्हावा यासाठी राजकीय डावपेच आखले जात आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपा आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असे तिन्ही पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काहीशी फूट पडल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असे सांगितले आहे. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या ठाकरे यांचा शिवसेना पक्ष मनसेसोबत युती करून ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
