Ambernath Viral Video : लिफ्ट बंद केल्याच्या रागातून 12 वर्षीय मुलाला बेदम मारहाण; अंबरनाथमधील CCTV Footage Viral
लिफ्टचा दरवाजा बंद केल्याप्रकरणी एका बारा वर्षाच्या मुलाला त्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका इसमाने बेदम मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. हा सर्व प्रकार लिफ्टच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्या इसमाविरुद्ध अंबरनाथ परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अंबरनाथमध्ये patels zion इमारतीमध्ये 14 व्या मजल्यावर राहणारा मुलगा रोजच्याप्रमाणे आपल्या क्लासला जात होता. त्यावेळी त्याला त्याचाच इमारतीमधील 9 व्या मजल्यावर राहणाऱ्या एका भाडेकरूने लिफ्ट बंद केल्याच्या शुल्लक कारणावरून मारहाण केली. त्याला शिव्याही देण्यात आल्या. याप्रकरणी त्या मुलाशी लोकशाहीच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्या मुलाने सगळा वृत्तांत कथन केला. त्याने सांगितले की, त्याने लिफ्टमध्ये एंट्री केल्यावर ती लिफ्ट 9 व्या मजल्यावर थांबली. मात्र बाहेर कोणीच दिसत नसल्यामुळे त्याने लिफ्ट बंद केली. मात्र अचानक 9 व्या मजल्यावरील कैलास नामक इसम याने लिफ्टचे बटन दाबून पुन्हा लिफ्ट उघडून आता आला. लिफ्टचे बटण बंद केल्याच्या रागात त्याने त्या मुलाला बेदम मारायला सुरुवात केली. तसेच शिवीगाळही केली. त्याचबरोबर त्याला तू बाहेर भेट मी तुला चाकूने ठार मारतो, अशी धमकीसुद्धा दिली.
याप्रकरणी त्याच्या वडिलांना विचारणा केली असता त्यांनी त्या कैलास नामक इसमाबद्दल माहिती देत सांगितले की, यावेळी त्या लिफ्टमध्ये असलेल्या हाऊसकीपिंगच्या महिलेने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो व्यक्ती न थांबता 9 व्या मजल्यापासून तळमजला येईपर्यंत मुलाला मारतच राहिला. लिफ्टमधून बाहेर आल्यावरसुद्धा त्याचा राग शांत झाला नाही, त्यामुळे त्याने पुन्हा त्या मुलाला मारायला सुरुवात केली. मात्र तिथे असलेल्या लोकांनी मध्यस्थी करून हा प्रकार थांबवला. याप्रकरणी त्या मुलाच्या वडिलांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये त्या व्यक्तीविरुद्द तक्रार दाखल केली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अंबरनाथ पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास करत आहेत.