Voter List : मुंबईत दीड लाख दुबार मतदार,पडताळणीनंतर आकडेवारीत मोठी घट

Voter List : मुंबईत दीड लाख दुबार मतदार,पडताळणीनंतर आकडेवारीत मोठी घट

मुंबई महानगरपालिकेच्या मतदार यादी पडताळणी प्रक्रियेत धक्कादायक माहिती समोर आली असून, शहरात तब्बल दीड लाख दुबार मतदार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई महानगरपालिकेच्या मतदार यादी पडताळणी प्रक्रियेत धक्कादायक माहिती समोर आली असून, शहरात तब्बल दीड लाख दुबार मतदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, सखोल पडताळणीनंतर या आकडेवारीत घट होत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

महापालिकेकडून सुरू असलेल्या मतदार यादी तपासणी मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जवळपास ११ हजार हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींची छाननी वेगाने सुरू असून, २३ डिसेंबरपर्यंत पडताळणीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

दोन टप्प्यांत दुबार नावे वेगळी

पहिल्या टप्प्यात एकाच प्रभागात नोंद असलेल्या मतदारांची दुबार नावे वेगळी काढण्यात आली असून, अशी सुमारे ९० हजार नावे असल्याची माहिती आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दोन वेगवेगळ्या प्रभागांत नोंद असलेल्या मतदारांची नावे शोधून काढण्यात आली आहेत.

कुर्ला परिसरात सर्वाधिक दुबार नावे

दुबार मतदारांची सर्वाधिक संख्या कुर्ला परिसरात आढळून आली आहे. त्याखालोखाल अंधेरी पश्चिम आणि कांदिवली या भागांमध्येही मोठ्या प्रमाणात दुबार नावे सापडली आहेत. यामुळे या भागांतील मतदार याद्यांच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हजारो गृहभेटी, हमीपत्रांची प्रक्रिया

पालिकेच्या माहितीनुसार आतापर्यंत ५३ हजार ५८५ गृहभेटी पूर्ण करण्यात आल्या असून, त्यापैकी २४ हजार ७२१ नागरिकांकडून हमीपत्रे भरून घेण्यात आली आहेत. या प्रक्रियेमुळे मतदार यादी अधिक पारदर्शक व अचूक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेची ही मोहीम आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, दुबार मतदारांची नावे वगळून अंतिम मतदार यादी तयार करण्यावर प्रशासनाचा भर आहे. २३ डिसेंबरनंतर अंतिम आकडेवारी स्पष्ट होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com