अयोध्येतला ट्रॅप, सेना, राणा ते थेट अफजल खानाची कबर...राज ठाकरेंच्या भाषणातील 7 मुद्दे
Raj Thackeray Pune Sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा पार पडली. मराठी अस्मितेच्या मुद्दयावरुन आपल्या राजकारणाला सुरुवात केलेल्या मनसेने सध्या हिंदुत्वाची भगवी शाल पांघरली आहे. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्दयावरुन राजकीय वातावरण ढवळून काढत मनसेने आपल्या नव्याल इनिंगची सुरुवात केली. यादरम्यानच आजची सभा देखील वादळी ठरली. पुण्यातील गणेश कला क्रिडा मंचाच्या सभागृहातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब्रीज भुषण सिंह, ठाकरे सरकार, राणा दाम्पत्य, अकबरुद्दी ओवैसी, संभाजीनगर असे अनेक मुद्दे उपस्थित करत जोरदार फटकेबाजी केली. (Raj Thackeray Ganesh Kala Krida Manch Speech)
1) उगाच पावसात कशाला भीजायचं?
राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात करताच ते म्हणाले की, आपल्या सभांना हॉल पुरत नाही. मात्र एस.पी. कॉलेजचे लोक सभेसाठी जागा देण्यास तयार नव्हते. मग त्यांनी आता यानंतर कुणालाच द्यायचा नाही. नदीपात्रातला विषय सुरु होता. मात्र पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे तिथे सभा कशाला असं म्हणत निवडणुका नसताना उगाच कशाला पावसात भिजायचं असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांचं नाव न घेता टोला लगावला.
2) पायावर शस्त्रक्रिया होणार
अयोध्या दौरा रद्द केल्यापासून चर्चा सुरु होती ती, त्यामागच्या कारणाची. त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी सांगितलं की, 1 तारखेला माझ्या पायाच्या त्रासासंदर्भात हीप बोनवर शस्त्रक्रिया होणार आहे. मी दोन ओळीत अयोध्या दौरा स्थगित झाल्याचं सांगितलं. मी जाणीवपूर्वक बफर झोन दिला, जेणेकरून काय बोलयाचं त्यांनी ते बोलावं. मात्र याबद्दल माझी भूमिका स्पष्ट आहे.
3) बृज भुषण सिंह चुकीचा पायंडा पाडताहेत...
बृज भुषण सिंह यांच्याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, मला मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशमधून मला माहिती मिळत होती. त्यानंतर मला लक्षात आलं हा सापळा आहे. या सर्व गोष्टींची सुरुवात ही महाराष्ट्रातून झाली. हा विषय पुन्हा बाहेर काढा असं सांगितलं गेलं. ज्यांना माझी अयोध्या वारी खुपत होती, त्यांनी हा डाव आखला. राम जन्मभुमीचं दर्शन मला घ्यायचं होतं, मात्र त्यासोबत कारसेवकांचे मृत्यू ज्याठिकाणी झाले होते, तिथे देखील भेट द्यायची होती. जर मी जाण्याचा हट्ट धरला असता, अन् तिथे जर काही झालं असतं, तर तुमच्यावर केसेस टाकल्या असत्या, तुम्हाला तुरुंगात टाकलं गेलं असतं. मात्र मला आपली पोरं हाकनाक वाया घालवायची नव्हती असं राज ठाकरे म्हणाले. एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, हे शक्य नाही. या सर्व गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. मला त्यातले अनेक पापुद्रे सांगू देखील शकत नाही. मी दौरा रद्द केला म्हणून शिव्या खायला आणि टीका सहन करायला सवय आहे असं राज ठाकरे म्हणाले. 14 वर्षानंतर माफी मागितली नाही तर येऊ देणार नाही असं म्हणणं म्हणजे चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच असेल तर गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाचा गृहस्थ आहे. एका बलात्कार प्रकरणानंतर गुजरातमधून त्यांना हाकलून देण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार असं राज ठाकरे म्हणाले. हे सर्व आता कसं काय सुरु झालं हा विचार करावा. आपलं हिंदुत्व आपले लाऊड स्पीकर यांना झोंबले असं राज ठाकरे म्हणाले.
4) राणा दाम्पत्यांवरही निशाणा
राज ठाकरे म्हणाले, आपण सांगितलं होतं ज्या मशिदीवरील भोंगे उतरणार नाही, आवाज कमी करणार नाही, त्या मशिदीसमोर हनुमान चालिसा वाचा. तर राणा दाम्पत्य मातोश्रीवर गेले. मातोश्री काय मशिद आहे का असं म्हणत राज ठाकरेंनी राणा दाम्पत्यांवर देखील निशाणा साधला. तसंच ते पुढे म्हणाले, राणा दाम्पत्य आणि संजय राऊत नंतर सोबत जेवताना दिसले, याबद्दल शिवसैनिकांना काहीच वाटत नाही का? यांचं हिंदुत्व केवळ पक-पक करण्यापूरत मर्यादित आहे असं राज ठाकरे म्हणाले.
5) आमचं हिंदुत्व खरं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा
आमचं हिंदुत्व खरं की खोटं सुरु आहे. हे काय वॉशिंग पॉवडर विकतायेत का? असा मिश्किल सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला. तसंच आमच्या हिंदुत्वाचा इफेक्ट लोकांना दिसतो असं राज ठाकरे म्हणाले. इथे मुंबईत पाकिस्तानी कलाकार येत होते, तेव्हा आम्ही त्यांना हाकललं. रझा अकादमीच्या लोकांनी पोलिसांवर अत्याचार केला, त्याविरोधात फक्त मनसेनं मोर्चा काढला. उद्धव ठाकरेंनी मला फक्त सांगावं की, त्यांच्यावर एक तरी आंदोलनाची केस आहे. महाविकास आघाडी सरकार पाहिलं तर बाळासाहेबांना आनंद होईल असं शिवसेना नेते म्हणत आहेत. शरद पवार म्हणतात आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी सोबत जेवायचो. शिवसेना या सर्व गोष्टींमुळे क्रेडीबीलीटी घालवते आहे असं राज ठाकरे म्हणाले.
6) औरंगजेब, औरंगाबाद... ते संभाजीनगर
संभाजीनगरचं नामांतर झालं सांगणारे तुम्ही आहे कोण? तुम्ही काय सरदार वल्लभ भाई पटेल आहात का? असा मिश्किल टोला लगावला. संभाजीनंतरचं नामांतर जाणीवपूर्वक केलं जात नाही, निवडणुकांसाठी तो मुद्दा ठेवला जातो. नरेंद्र मोदींनी संभाजीनगर नाव करुन शिवसेनेचा निवडणुकीचा मुद्दा संपवून टाकावा. शिवसेनेने औरंगाबादेत एमआयएमला वाढवलं. यांना कळालंही नाही की आपण राक्षस वाढवतोय. यांच्यामुळे त्यांचा खासदार आला, त्यामुळे लोक आता औरंगजेबाच्या कबरीवर लोक डोकं टेकवण्याची हिंमत करत आहेत. शरद पवार तर म्हणतील औरंगजेब सुफी संत आहे. औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवल्यावर महाराष्ट्र खवळेल असं वाटलं होतं, मात्र सगळे शातं आहेत. अफजल खानाच्या कबरीचा विस्तार आता, 15 ते 20 हजार फुटात झाला आहे. तिथे मशिद उभी राहिली असून, त्याला निधी दिला जातोय. मात्र हे सर्व सुरु असताना आम्ही षंढ आहोत.
7) भोंग्याचा विषय काढलाच आहे तर तुकडा पाडून टाका
आम्ही भोंग्याचा विषय काढला. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा सकाळची अजान बंद झाली. शेतकरी आत्महत्या सुरु आहे, पाणी येत नाही, कुणी येऊन औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवतो, मात्र आम्ही षंढ आहोत. यामुळे 900 वर्ष हा देश पारतंत्र्यात होतो. गझनी मुघलांनी, इंग्रजांनी राज्य केलं कारण आम्ही षंढ होतो. लाऊड स्पीकरचं आंदोलन एका दिवसासाठी नाही, ते तुम्हाला चेक करत आहेत. हळू हळू ते आवाज वाढवतील. त्यामुळे आता एकदा मुद्दा काढलाच आहे तर तुकडा पाडून टाका असं राज ठाकरे म्हणाले. हे आंदोलन आहे, येणाऱ्या काही दिवसात काही पत्रकं मी वाटणार आहेत. कायद्याचं पालन करा सांगणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत आहेत असं राज ठाकरे म्हणाले.
विषेश म्हणजे, राज ठाकरे यांनी या सभेत भाषणाची सुरुवात करण्यापूर्वीच कार्यक्रमासाठी उपस्थित शहरातील काही अंध विद्यार्थ्यांना व्यासपीठावर खुर्च्या देऊन त्यांना व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था करुन दिली होती. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी केलेल्या कृतीचं सर्वांनीच टाळ्या वाजवून स्वागत केलं होतं.