Mumbai Metro : 2026 हे वर्ष मुंबई मेट्रोचे! 22 किमीच्या तीन नव्या मार्गिका लवकरच सुरू होणार
लवकरच मुंबईकरांची लोकल ट्रेनमधील प्रचंड गर्दीतून मोठी सुटका होणार आहे. कारण, लोकलला प्रभावी पर्याय ठरणाऱ्या मेट्रो सेवेचा मोठा विस्तार 2026 मध्ये होणार असून, मुंबईत तीन नवीन मेट्रो मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे दररोजचा प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबईत एकूण 350 किलोमीटर लांबीच्या 17 मेट्रो मार्गिका नियोजित आहेत. यापैकी सध्या सुमारे 70 किलोमीटर लांबीच्या चार मार्गिका कार्यरत असून, नवीन वर्षाच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 22 किलोमीटर लांबीच्या तीन नव्या मार्गिका सुरू होणार आहेत. यामुळे पश्चिम, मध्य आणि पूर्व उपनगरांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मेट्रो 4A म्हणजेच गायमुख–कासरवडवली–घाटकोपर–वडाळा ही मार्गिका ठाणे आणि मुंबईला जोडणारी महत्त्वाची लाईन आहे. ही मार्गिका डिसेंबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा होती, मात्र सध्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शनदरम्यान दहा स्थानकांवर मेट्रो सुरू होण्याचे संकेत असून, 2026 च्या मध्यापर्यंत ती पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे.
मेट्रो 9 ही उन्नत मार्गिका दहिसर पूर्व ते भाईंदरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत धावणार आहे. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशीगाव अशी चार स्थानके तयार असून, आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर 2026 च्या सुरुवातीला पंतप्रधानांच्या हस्ते या लाईनचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
तर मेट्रो 2B ही पश्चिम मुंबईला पूर्व किनाऱ्याशी जोडणारी महत्त्वाची मार्गिका असून, ईएसआयसी नगर ते मांडला अशी धावणार आहे. मांडला ते चेंबूरदरम्यानचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, 2026 च्या सुरुवातीला ही मार्गिकाही प्रवाशांसाठी खुली होणार आहे. या तिन्ही मेट्रो मार्गिकांमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, लोकलवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
