Police Bharti : राज्यात 40 हजार पोलिसांची भरती; सांगलीत तीन नवीन इमारतींचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
राज्यात आदर्श पोलीस प्रशासन घडवण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या असावी, या दृष्टीने गृह विभागामार्फत 40 हजार नवीन पोलिसांची भरती करण्यात आली असून, यापुढील काळातही पोलीस भरतीला प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उभारण्यात आलेल्या तीन नवीन इमारतींचे उद्घाटन आणि निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, जयंत पाटील, डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, डॉ. विश्वजीत कदम, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, सुहास बाबर, अमल महाडिक, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा, डॉ. शशिकांत माहवरकर, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, "पोलीस गृहनिर्माण महामंडळामार्फत राज्यात पोलिसांसाठी कार्यालये व निवासस्थाने उभारण्यात आली असून, सध्या 94 हजार निवासस्थाने उपलब्ध आहेत. प्रत्येक जिल्ह्यात फॉरेंसिक व्हॅन उपलब्ध करण्यात आली असून, सायबर गुन्ह्यांच्या तपासात महाराष्ट्र पोलीस देशात आघाडीवर आहे. अंमली पदार्थांशी संबंधित कोणताही पोलिस कर्मचारी दोषी आढळल्यास त्याला थेट बडतर्फ करण्यात येईल," असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त 2 कोटी 13 लाख रुपये किंमतीच्या 16 वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. सायबर विभागासाठी 150 संगणक, 150 स्कॅनर आणि 40 मल्टी फंक्शन प्रिंटरचे हस्तांतरण करण्यात आले. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसह कडेगाव व आटपाडी पोलीस ठाण्यांच्या इमारतींचे उद्घाटन केले. सांगलीत 224 सदनिकांच्या इमारतीचे रिमोटद्वारे भूमिपूजनही करण्यात आले.
या नव्या प्रशासकीय इमारतीत आधुनिक कार्यालये, प्रशिक्षण हॉल्स, गुन्हे अन्वेषण विभाग, कर्मचारी वसतिगृहे, सीसीटीव्ही यंत्रणा, सौरऊर्जा सुविधा, दिव्यांग अनुकूल रचना, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आणि ऊर्जा कार्यक्षम वास्तूरचना करण्यात आली आहे. चार मजली या इमारतीचे 5244 चौ. मीटर बांधकाम असून 14 कोटी 34 लाख रुपयांचा खर्च झाला आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या पोलीस दलासाठी शासन वचनबद्ध असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निधी व पाठबळ दिले जाईल. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रास्ताविकामध्ये नव्या सुविधांमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.