Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, मृतदेह सापडला
थोडक्यात
बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
नेमकी घटना काय?
ग्रामस्थांचा संतप्त पवित्रा
खारे कर्जुने येथे बिबट्याच्या हल्ल्यात रियांका पवार या पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. तब्बल १६ तासांच्या शोध मोहिमेनंतर आज सकाळी तिचा मृतदेह काटवनात आढळून आला.
नेमकी घटना काय?
काल (बुधवारी) संध्याकाळच्या सुमारास बिबट्याने रियांका पवार हिला उचलून नेले होते. तेव्हापासून ग्रामस्थ आणि वन विभाग तिचा शोध घेत होते. आज सकाळी १६ तासांच्या अथक शोधानंतर त्या चिमुकलीचा मृतदेह सापडला.
ग्रामस्थांचा संतप्त पवित्रा
या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तातडीची बैठक घेतली. जोपर्यंत या नरभक्षक बिबट्याला जेरबंद केले जात नाही किंवा ठार मारले जात नाही, तोपर्यंत रियांकाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
वन अधिकाऱ्यांना घेराव
बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्याला घेराव घालत धारेवर धरले. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याच्या हल्ल्याने खारे कर्जुने गावावर शोककळा पसरली असून, नरभक्षक बिबट्याला पकडल्यानंतरच चिमुकलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातील, असा निश्चय ग्रामस्थांनी केला आहे.
