Crime News : चितेगावमध्ये मियाँभाईच्या खुनाची उकल; सहा आरोपींना पोलीस कोठडी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चितेगाव (ता. पैठण) येथील शेख अकबर महेबूब शेख ऊर्फ मियाँभाई (51) यांच्या अपहरणानंतर निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला होता. आता या प्रकरणाची उकल झाली असून, बिडकीन पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात मृताचा मुलगा साहिल अकबर शेख याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रऊफ याकूब शेख यांच्या खुनाच्या गुन्ह्यात मियाँभाई व त्यांच्या कुटुंबियांची निर्दोष मुक्तता झाल्याने याचा राग मनात धरून आरोपींनी ही कटकारस्थाने केली. 30 जून रोजी चितेगाव येथून मियाँभाई यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणात वाहेद याकूब शेख, लतीफ याकूब शेख, मोबीन मुनाफ सय्यद (चितेगाव), शाहरुख ऊर्फ फजल सरदार शेख (कायगाव), सोनाजी भुजबळ (दहिफळ) आणि इक्बाल अहमद जमादार (एमआयडीसी, पैठण) यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास बिडकीनचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश शेळके करत आहेत.
खुनानंतर मृताचा अपहरण बिडकीन हद्दीतून, चारचाकी वाहन चिकलठाणा हद्दीत, मोबाईल फोन एमआयडीसी हद्दीत व मृतदेह दादेगाव मुंगी (पैठण हद्दी) येथे सापडल्याने आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय साधत तीन स्वतंत्र पथके तयार केली. तसेच वैजापूर येथून एका आरोपीला अटक केली. या घटनेमुळे चितेगाव परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी पुढील तपास जलदगतीने सुरू केला आहे.