Russia Earthquake : रशियाच्या कमचात्का भागात 7.4 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा धोका टळला
रशियाच्या फार ईस्टमधील कमचात्का प्रदेशात शनिवारी पहाटे जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केलवर नोंदवली गेली. भूकंप पेत्रोपावलोव्स्क-कमचात्स्की शहरापासून सुमारे 111 किलोमीटर अंतरावर आणि जवळपास 39 किलोमीटर खोलीवर झाला.
सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता 7.5 असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र नंतर ती 7.4 वर दुरुस्त करण्यात आली. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने (PTWC) काही किनारी भागांसाठी धोक्याचा इशारा दिला होता. अंदाजानुसार 1 मीटर उंचीपर्यंत लाटा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तथापि, नंतर अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले की त्सुनामीचा धोका टळला आहे.
कमचात्का प्रदेशात यापूर्वीही मोठ्या तीव्रतेचे भूकंप झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी येथे 8.8 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यामुळे पॅसिफिक महासागरात चार मीटर उंचीपर्यंत त्सुनामीच्या लाटा उठल्या होत्या. त्या वेळी हवाईपासून जपानपर्यंत लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले होते.
या ताज्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी किंवा आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.