Chikungunya Dengue Patients : राज्यात चिकनगुनियाचे 741, तर डेंग्यूचे 1590 रुग्ण; आरोग्य विभागाचे दक्षतेचे आवाहन
कोरोनापाठोपाठ आता साथीच्या आजारांनीही राज्यात डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांपैकी चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या समोर आली आहे. मे 2024 च्या तुलनेत 31 मे 2025 च्या अखेरपर्यंत चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असली तरी राज्यभरात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाढीचा धोका पाहता आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मे महिनाअखेर राज्यातील चिकनगुनियाच्या एकूण 13,858 तपासण्यांमधून चिकनगुनियाचे 834 रुग्ण आढळून आले. गेल्या वर्षी याच काळात चिकनगुनियाचे 607 रुग्ण आढळले होते. 31 मे अखेर डेंग्यूच्या 30,077 तपासण्यांद्वारे 1,820 रुग्णांना डेंग्यूचे निदान झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात डेंग्यूचे 2,126 रुग्ण आढळले होते. तुलनेत या वर्षी डेंग्यू रुग्णसंख्या कमी आहे. आजपर्यंत चिकनगुनिया व डेंग्यूच्या एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नसल्याची बाब दिलासादायक आहे.