Tejas jet : वायूदलाच्या ताफ्यात 97 नवी तेजस विमानं दाखल होणार
थोडक्यात
भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार
वायूदलाच्या ताफ्यात 97 नवी तेजस विमानं दाखल होणार
तेजस खरेदीसाठी 66,500 कोटींचा नवा करार
( Tejas jet) भारतीय हवाई दलाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार आज हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत 97 तेजस मार्क-1A लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी तब्बल 66,500 कोटी रुपयांचा करार करण्याच्या तयारीत आहे. हा करार आतापर्यंतचा सर्वात मोठा लढाऊ विमान खरेदी करार ठरणार आहे. त्यामुळे वायूदलाच्या ताफ्यात 97 नवी तेजस विमानं दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
ही प्रक्रिया मिग-21 विमाने सेवामुक्त होण्याच्या पार्श्वभूमीवर गतीमान करण्यात आली आहे. मिग-21 ची 36 विमानं निवृत्त झाल्यानंतर हवाई दलाची ताकद केवळ 29 स्क्वॉड्रन्सवर येणार आहे. एका स्क्वॉड्रनमध्ये सरासरी 16 ते 18 विमानं असतात. याआधी 2021 मध्ये 83 सुधारीत तेजस विमानांसाठी 46,898 कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता.
मात्र, त्या करारानुसार अद्याप हवाई दलाला विमानं मिळालेली नाहीत. HAL ने माहिती दिली आहे की, या करारातील पहिले दोन विमानं ऑक्टोबरमध्ये सुपूर्द केली जातील. हवाई दलाने मात्र स्पष्ट केले आहे की, आवश्यक शस्त्रास्त्रांच्या यशस्वी चाचणीनंतरच विमानं स्वीकारली जातील.