Thane KDMC Ulhasnagar reservation : ठाण्यात दलित, KDMC मध्ये आदिवासी महापौर; उल्हासनगरमध्ये ओबीसींना संधी

Thane KDMC Ulhasnagar reservation : ठाण्यात दलित, KDMC मध्ये आदिवासी महापौर; उल्हासनगरमध्ये ओबीसींना संधी

29 महानगरपालिकांमधील महापौरपदासाठी आज (गुरुवार) आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली असून, त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौरपदासाठी आज (गुरुवार) आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली असून, त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. मुंबईनंतर सर्वाधिक लक्ष लागून असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचं (KDMC) महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलं आहे. त्यामुळे केडीएमसीमध्ये पहिल्यांदाच आदिवासी समाजातून महापौर निवडला जाणार आहे.

केडीएमसीमध्ये शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपने युतीत निवडणूक लढवली होती. मात्र निकालानंतर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणं बदलली. आता ST प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झाल्यानंतर कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या समाजातील उमेदवार पुढे येतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संभाव्य उमेदवारांची चाचपणी आणि अंतर्गत लॉबिंगला वेग आला आहे.

ठाणे महानगरपालिकेचं महापौरपद यंदा अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी जाहीर झालं आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. एकूण 131 जागांपैकी 71 जागांवर विजय मिळवत, आघाडीच्या जागांसह शिंदे गटाचा आकडा 75 पर्यंत पोहोचला आहे. भाजपने 28 जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 12 जागांवर विजयी झाली आहे. त्यामुळे ठाण्यातील महापौरपद शिंदे गटाच्याच पारड्यात जाण्याची शक्यता अधिक आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेत महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलं आहे. येथेही शिंदे गटाने बहुमताचा 40 चा जादुई आकडा पार करत सत्ता आपल्या हाती घेतली आहे. त्यामुळे ओबीसी समाजातून महापौर निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, संभाव्य उमेदवारांमध्ये स्पर्धा रंगण्याची चिन्हं आहेत.

राज्यातील 29 महापालिकांमध्ये SC साठी 3, ST साठी 1, ओबीसीसाठी 8 आणि ओपन प्रवर्गासाठी 17 महापौरपदांची सोडत जाहीर झाली आहे. ही प्रक्रिया जरी औपचारिक असली, तरी आगामी काळात राज्यातील महापालिकांचं राजकारण, सत्ता-समीकरणं आणि आघाड्या याच आरक्षणावर ठरणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com