Crime : पैशासाठी माणुसकीला तिलांजली; जमिनीच्या वादामुळे दोन दिवस मृतदेह अडकला
औराया उत्तर प्रदेश येथे पैशासाठी माणुसकीला तिलांजली दिल्याचे धक्कादायक उदाहरण उत्तर प्रदेशात घडले आहे. जमिनीच्या वाटणीवरून झालेल्या वादामुळे एका कुटुंबाने वडिलांचा मृतदेह तब्बल दोन दिवस अंत्यसंस्काराविना ठेवला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतरच जमीन वाटप झाले आणि अखेर मुलीच्या हस्ते अंत्यसंस्कार पार पडले. ही घटना औराया जिल्ह्यातील कोतवाली हद्दीतील औरेखी गावात उघडकीस आली.
सुरेश कुमार (५२) यांचे अचानक निधन झाले. त्यांच्या मृत्यूवर संशय आल्याने मुलगी शिल्पी हिने पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या काळात कुटुंबात जमिनीच्या मालकीवरून वाद उफाळला. सुरेश यांच्या वडिलांच्या नावावर ११ बिघा जमीन असून, सुरेश यांच्या पत्नीने त्यातील हिस्स्याची मागणी केली.
या वादामुळे दोन दिवस मृतदेहावर अंतिम संस्कार होऊ शकले नाहीत. अखेर सोमवारी दिवसभर चर्चेनंतर सुरेशचे वडील माता प्रसाद यांनी जमीन आपल्या दोन मुलांत विभागून दिली. त्यानंतर घरातील तणाव निवळला आणि मुलीने वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
या प्रकारामुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, “पैशासाठी मृतदेह दोन दिवस अडवणे ही माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.