MHADA Lottery 2026 : सर्वसामान्यांसाठी हक्काच्या घराची सुवर्णसंधी; मुंबई-उपनगरात ७ हजार घरांची म्हाडा लॉटरी लवकरच

MHADA Lottery 2026 : सर्वसामान्यांसाठी हक्काच्या घराची सुवर्णसंधी; मुंबई-उपनगरात ७ हजार घरांची म्हाडा लॉटरी लवकरच

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (MHADA) मुंबई आणि उपनगरात तब्बल ७ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

सर्वसामान्यांचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच साकार होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (MHADA) मुंबई आणि उपनगरात तब्बल ७ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळासह कोकण मंडळाकडून ही बहुप्रतिक्षित सोडत जाहीर होणार असून, मार्च २०२६ मध्ये लॉटरी प्रक्रिया पार पडण्याची अपेक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुमारे ३ हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. ही घरे प्रामुख्याने मुंबईतील विविध पुनर्विकास प्रकल्प आणि गृहनिर्माण योजनांअंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याचबरोबर कोकण मंडळाच्या अंतर्गत ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार परिसरात सुमारे ४ हजार घरांची स्वतंत्र लॉटरी निघणार आहे. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) घर खरेदीदारांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत म्हाडाच्या घरांच्या लॉटरीबाबत चर्चा सुरू होती. महानगरपालिका निवडणुका आणि आचारसंहिता संपल्यानंतर आता म्हाडा प्रशासनाने गृहनिर्माण योजनांना वेग दिला आहे. प्रशासनाकडून लॉटरी प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावर्षी मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये बीडीडी चाळ, मोतीलाल नगर, जीटीबी नगरमधील पंजाबी कॉलनी, पत्रा चाळ, अभ्युदय नगर, पूनम नगर तसेच अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर या मोठ्या प्रकल्पांचा समावेश असण्याची शक्यता आहे. हे प्रकल्प सध्या नियोजन आणि अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत.

या भागांतील घरे मिळाल्यास नागरिकांना मुंबईतील मध्यवर्ती आणि विकसित परिसरात राहण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक अर्जदारांनी housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. कमी व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी म्हाडाची ही लॉटरी नेहमीच आशेचा किरण ठरली आहे. परवडणाऱ्या दरात घरे, रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधा आणि चांगली कनेक्टिव्हिटी यामुळे म्हाडाच्या घरांना मोठी मागणी असते. म्हाडाच्या ७६ वर्षांच्या प्रवासात आतापर्यंत महाराष्ट्रभरात सुमारे ९ लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती करून त्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे २०२६ मधील ही लॉटरीही सर्वसामान्य नागरिकांसाठी हक्काचे घर मिळवण्याची मोठी संधी ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com