Lufthansa Hyderabad Flight : आला तसाच परत गेला! हैदराबादकडे येणाऱ्या फ्लाइटला का घ्यावा लागला यूटर्न?

Lufthansa Hyderabad Flight : आला तसाच परत गेला! हैदराबादकडे येणाऱ्या फ्लाइटला का घ्यावा लागला यूटर्न?

फ्रँकफर्टहून हैदराबादकडे येणाऱ्या लुफ्थांसा फ्लाइटने प्रवासादरम्यान बॉम्ब धमकीमुळे हवेत असतानाच परतीचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

फ्रँकफर्टहून हैदराबादकडे येणाऱ्या लुफ्थांसा फ्लाइटने प्रवासादरम्यान बॉम्ब धमकीमुळे हवेत असतानाच परतीचा निर्णय घेतल्याची माहिती हैदराबाद विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही धमकी विमान भारतीय हद्दीत येण्याआधीच मिळाल्याचे सांगण्यात आले. लुफ्थांसा फ्लाइट LH752 ने रविवारी दुपारी 2:14 वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:44 वाजता) फ्रँकफर्टहून उड्डाण केले होते. सोमवारी पहाटे हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याचे नियोजन होते. मात्र उड्डाणाच्या दोन तासांनंतर विमानाने परतीचा मार्ग स्वीकारला.

विमानातील एका प्रवाशाने सांगितले की, प्रवास सुरळीत सुरू असताना, अचानक विमान परत जात असल्याची माहिती देण्यात आली. “आम्हाला फ्रँकफर्टमध्ये पुन्हा आणण्यात आले. विमानतळावर कंपनीकडून राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्या सकाळी 10 वाजता (भारतीय वेळेनुसार 1:30 वाजता) पुन्हा त्याच विमानाने प्रवास सुरू होईल,” असे त्या प्रवाशाने पीटीआयला सांगितले. लुफ्थांसा वेबसाइटनुसार, विमान स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता) पुन्हा फ्रँकफर्टला परतले. हे विमान बोईंग 787-9 ड्रीमलाइनर प्रकाराचे आहे.

लुफ्थांसा प्रवक्त्यांनी सांगितले की, हैदराबाद विमानतळ प्रशासनाने उतरायला परवानगी दिली नसल्याने परतीचा निर्णय घेण्यात आला. धमकीच्या स्वरूपाबाबत अद्याप तपशील मिळालेला नाही. दरम्यान, बोईंग 787 प्रकाराचे विमान अलीकडे अहमदाबाद येथे झालेल्या अपघातामुळे चर्चेत आहे, ज्यात 241 प्रवासी आणि मेडिकल होस्टेलमधील 33 जण मृत्युमुखी पडले होते.आता या बॉम्ब धमकी प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com