Taj Mahal Home : "प्यार की निशानी 2.0"; चक्क नवऱ्याने बायकोसाठी बांधलं ‘ताजमहल’सारखं घर
जगप्रसिद्ध ताजमहाल जसा शाहजहानने मुमताजसाठी बांधला, तसंच प्रेमाचं एक नविन प्रतीक आता मध्यप्रदेशातील बुरहानपुरमध्ये उभं राहिलं आहे. येथील आनंद प्रकाश चौकसे यांनी आपल्या पत्नीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी ताजमहालाच्या धर्तीवर आलिशान घर उभारलं आहे. सध्या या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, हे प्रेमाचं घर सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.
आनंद प्रकाश चौकसे यांनी अत्यंत बारकाईने ताजमहालची रचना अभ्यासून हे घर बांधलं आहे. ताजमहालचं मीटरमधील मोजमाप कन्व्हर्ट करून तेवढ्याच लांबीचे आणि रुंदीचे घर फूट मोजमापमध्ये त्यांनी उभारलं आहे. या घराचं बाह्य स्वरूप ताजमहालची आठवण करून देणारं आहे आणि घराच्या आतील इंटीरियरही तितकंच भव्यदिव्य आहे. नक्षीदार खांब, भव्य घुमट, सुंदर कोरीव दरवाजे आणि प्रशस्त हॉल ही या घराची खास वैशिष्ट्ये आहेत.
हे घर केवळ प्रेमाचं प्रतीक नाही, तर सामाजिक योगदानाचंही उदाहरण आहे. आनंद चौकसे आणि त्यांची पत्नी बुरहानपुरमध्ये एक गुरुकुल देखील चालवतात, जिथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या गुरुकुलाजवळच त्यांनी आपलं ताजमहालसारखं घर उभारलं आहे, जे आज अनेकांसाठी आकर्षण ठरत आहे.