EPFO : EPFO सदस्यांसाठी मोठी डिजिटल क्रांती; काय आहे नवी सुविधा?
कर्मचारी भविष्य निधी संघटनेत (EPFO) नोंदणीकृत कोट्यवधी सदस्यांसाठी लवकरच मोठी डिजिटल सुविधा सुरू होणार आहे. आता भविष्य निर्वाह निधीतील (PF) पैसा काढणे अधिक सोपे, जलद आणि कागदपत्रांविना होणार आहे. EPFO लवकरच BHIM UPI ॲपच्या माध्यमातून थेट आगाऊ PF रक्कम काढण्याची सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही सुविधा येत्या 2 ते 3 महिन्यांत सुरू होण्याची शक्यता असून, ATM सुविधेपूर्वीच ती लागू होऊ शकते.
या नव्या डिजिटल सेवेचा फायदा देशातील सुमारे 30 कोटींपेक्षा अधिक EPFO सदस्यांना होणार आहे. सध्या PF मधून पैसे काढण्यासाठी ऑनलाईन क्लेम अर्ज, कागदपत्रांची तपासणी आणि अनेक दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. मात्र नव्या व्यवस्थेमुळे गरज पडल्यास कर्मचारी काही मिनिटांतच आगाऊ रक्कम मिळवू शकणार आहेत. यामुळे EPFO चा हा उपक्रम एक मोठा डिजिटल बदल मानला जात आहे.
काय आहे ही नवी सुविधा?
या सुविधेसाठी EPFO ने NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) सोबत करार केला आहे. BHIM UPI ॲपवरून EPFO सदस्य आरोग्य, शिक्षण, विवाह किंवा इतर विशेष कारणांसाठी आगाऊ PF रक्कम काढण्यासाठी थेट दावा करू शकतील. क्लेम केल्यानंतर EPFO कडून खात्याची तात्काळ पडताळणी केली जाईल. सर्व माहिती योग्य आढळल्यास दावा मंजूर केला जाईल आणि SBI च्या माध्यमातून संबंधित UPI खात्यात थेट रक्कम जमा केली जाईल. सुरुवातीला ही सुविधा केवळ BHIM ॲपवर उपलब्ध असेल. मात्र पुढील टप्प्यात Google Pay, PhonePe यांसारख्या इतर UPI आधारित फिनटेक ॲप्सवरही ही सुविधा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रक्कम काढण्यावर मर्यादा
ही सुविधा पूर्ण PF रक्कम काढण्यासाठी नसून, आगाऊ रकमेपुरती मर्यादित असेल. RBI आणि UPI व्यवहारांच्या नियमांनुसार एका ठराविक मर्यादेतच पैसे काढता येणार आहेत. यामुळे गैरवापर टाळता येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. संपूर्ण PF रक्कम त्वरित काढण्यास परवानगी देणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे टप्प्याटप्प्याने सुविधा वाढवली जाणार आहे.
ATM आणि डेबिट कार्डचीही तयारी
EPFO सदस्यांसाठी भविष्यात PF खात्याशी जोडलेले डेबिट कार्डही सुरू करण्यात येणार आहे. या कार्डच्या मदतीने कोणत्याही ATM वरून थेट PF खात्यातील रक्कम काढता येईल. विशेष म्हणजे यासाठी बँक खात्याची आवश्यकता भासणार नाही. एकूणच, BHIM UPI द्वारे PF रक्कम काढण्याची ही सुविधा EPFO सदस्यांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, डिजिटल भारताच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे
