BMC Election : मुंबई महापालिकेत बहुरंगी लढत; २२७ जागांसाठी २५००हून अधिक अर्ज दाखल

BMC Election : मुंबई महापालिकेत बहुरंगी लढत; २२७ जागांसाठी २५००हून अधिक अर्ज दाखल

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया काल संपली असून, या निवडणुकीत २,५०१ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया काल संपली असून, या निवडणुकीत २,५०१ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मुंबईतील विविध विभागांमध्ये चांगलीच धावपळ पाहायला मिळाली.

अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांच्या कार्यालयांबाहेर एबी फॉर्म मिळवण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. त्याचप्रमाणे, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नेमण्यात आलेल्या केंद्रांवरही उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांची लक्षणीय गर्दी दिसून आली. युती, आघाडी, बंडखोर तसेच अपक्ष उमेदवार अशा सर्वच घटकांकडून मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यात आले असून, त्यामुळे यंदाची मुंबई महानगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.

राजकीय पक्षांकडून दिलेल्या अधिकृत उमेदवारांबरोबरच बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याने अनेक प्रभागांमध्ये तिरंगी व चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रमुख पक्षांतील अंतर्गत नाराजीमुळे काही ठिकाणी बंडखोरांनी स्वतंत्र उमेदवारी दाखल केल्याचे चित्र आहे.

निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्पा म्हणून आज सर्व उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. या छाननीत नियमांची पूर्तता, कागदपत्रांची वैधता आणि उमेदवारांची पात्रता तपासली जाणार आहे. त्यानंतर उद्या आणि परवा असे दोन दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. या टप्प्यात काही उमेदवार माघार घेण्याची शक्यता असून, त्यानंतरच अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार १५ जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान होणार असून, त्यानंतर १६ जानेवारी रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले आहेत. एफ दक्षिण विभागात ७५ अर्ज, एल विभागात १११ अर्ज, एन विभागात १२३ अर्ज, तर पी उत्तर विभागात ८९ अर्ज दाखल झाले आहेत. ए, बी आणि ई विभागात मिळून तब्बल १५० अर्ज प्राप्त झाले असून, एस विभागात १२६, के पश्चिम विभागात १३३, आणि आर उत्तर विभागात ६० अर्ज प्राप्त झाले आहेत.

याशिवाय टी विभागात १०९, सी व डी विभागात ५८, जी उत्तर विभागात १३७, तर एम पूर्व विभागात सर्वाधिक १८२ अर्ज दाखल झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. एच पूर्व विभागात १२५, पी दक्षिण विभागात ८१, आर दक्षिण विभागात १०९, एफ उत्तर विभागात १८८, आणि जी दक्षिण विभागात ८६ अर्ज प्राप्त झाले आहेत. एम पूर्व व एम पश्चिम मिळून १६४, के पूर्व व एच पश्चिम मिळून ८७, पी पूर्व विभागात ११७, तर एल (RO-17) विभागात १३१ अर्ज दाखल झाले आहेत.

या आकडेवारीवरून मुंबई महानगरपालिका निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची आणि रंगतदार ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अर्ज छाननीनंतर आणि माघारीनंतर नेमकी किती उमेदवार अंतिम रिंगणात राहतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

थोडक्यात

  • मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी २२७ जागांसाठी २५०१ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात

  • पालिका निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता

  • शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले

  • राजकीय पक्षांच्या कार्यालयांबाहेर एबी फॉर्मसाठी गर्दी पाहायला मिळाली

  • अर्ज दाखल करण्याच्या केंद्रांवर उमेदवार व कार्यकर्त्यांची झुंबड

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com