Konkan To Mahabaleshwar Bridge: आता कोकणातून थेट महाबळेश्वरला जाता येणार! लवकरच तयार होणार नवा ब्रिज
अवघ्या काही महिन्यात राज्यात पावसाच्या सरी पडायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होताच देशभरातले निसर्गप्रेमी पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरणाचा आणि पर्यावरणाचा आनंद घेण्यासाठी घरातून बाहेर पडतात. अशातचं आता निसर्गभेटीसाठी निघालेल्या पर्यटकांकरीता आनंदाची बातमी समोर आली आहे.
पावसाळा म्हटलं की, अनेकांचं मन आणि पाय हे कोकण, महाबळेश्वर आणि माथेरान अशा ठिकाणी वळतात. अशातच आता कोकणातून थेट महाबळेश्वरला सुस्साट जाता येणार आहे. यासाठी लवकरच 175 कोटींचा नवा ब्रिज तयार होणार आहे. नव्या मोठ्या पुलामुळे पावसाळ्याच्या दिवसात धोकादायक ठरणारा जीवघेणा कोयना बॅकवॉटरमधून बार्जमधील प्रवास वाचणार आहे.
विविध कामानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल. कारण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या नव्या मार्गाचे काम सुरू आहे. कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी नवा जवळचा मार्ग तयार करण्यात येत आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडणारा केबल स्टे ब्रिज उभारण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांकरीता ही फार आनंदाची बातमी आहे.