Kalyan Dombivli : कल्याण–डोंबिवली राजकारणात नवा ट्विस्ट; शिंदे गट–मनसे छुप्या युतीची शक्यता

Kalyan Dombivli : कल्याण–डोंबिवली राजकारणात नवा ट्विस्ट; शिंदे गट–मनसे छुप्या युतीची शक्यता

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांच्यात छुपी युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांच्यात छुपी युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे यांच्यात पडद्यामागे खेळी सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. केडीएमसीच्या सध्याच्या राजकीय गणिताकडे पाहिले असता, बहुमतासाठी आवश्यक असलेला ६२ चा जादुई आकडा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाकडे ५३ नगरसेवक आहेत, तर मनसेकडे ५ नगरसेवक आहेत. याशिवाय, उद्धव ठाकरे गटातून शिवसेनेत गेलेले २ नगरसेवक आणि उबाठा गटातून मनसेकडे गेलेले २ नगरसेवक धरल्यास एकूण आकडा ६२ पर्यंत पोहोचतो. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमत पूर्ण होत असल्याचे चित्र आहे.

याच पार्श्वभूमीवर, मंगळवारी रात्री शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसेचे नेते राजू पाटील यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर केडीएमसीत शिंदे गटाचा महापौर बसण्याचा मार्ग सोपा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, या बैठकीबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, मनसेचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देण्यामागे भाजपाला सत्तेपासून रोखण्याची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजपाची वाढती ताकद लक्षात घेता, शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दुसरीकडे, या घडामोडींवर ठाकरे गटाकडूनही लक्ष ठेवण्यात येत आहे. शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियावर सूचक ट्विट करत, “मशाल चिन्हावर निवडून येऊन पक्षाचे आदेश मानत नसतील, तर कारवाई होणार,” असा इशारा दिला आहे. त्यांच्या या ट्विटमुळे पक्षांतर्गत कारवाई आणि संभाव्य फूट याबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. आता केडीएमसीत सत्ता नेमकी कोणाच्या हातात जाणार, शिंदे गट–मनसे युती अधिकृत होणार का, आणि भाजपाची पुढील भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com