Sanjay Raut
Sanjay RautSanjay Raut

Sanjay Raut : ठाकरे बंधूंची मुंबईतील सभा रोखण्याचा डाव? शिवाजी पार्कवर अडवणूक सुरू असल्याचा संजय राऊतांचा आरोप

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना (उबाठा)गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोपांची तोफ डागली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Sanjay Raut on Thackeray Bandhu : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोपांची तोफ डागली आहे. दोन ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मुंबईतील संभाव्य संयुक्त सभेला रोखण्यासाठी सत्ताधारी गटाकडून शिवाजी पार्क मैदानाबाबत जाणीवपूर्वक अडवणूक सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी सांगितले की, मुंबईत सभा घेण्यासाठी ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदान आधीच ‘आढवून’ ठेवले गेले असून, प्रत्यक्षात तिथे कोणताही कार्यक्रम नसतानाही मैदान उपलब्ध करून दिले जात नाही. “शिवसेना–मनसे महायुतीला सभा घेता येऊ नये, हाच यामागचा राक्षसी हेतू आहे,” असा आरोप त्यांनी केला.

निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकारांचा आरोप

निवडणूक प्रक्रियेवरही संजय राऊत यांनी तीव्र टीका केली. कुलाबा मतदारसंघात पैसे घेऊन टोकन वाटप करण्यात आले, मात्र काही उमेदवारांना प्रत्यक्षात अर्ज भरू दिले नाहीत, असा दावा करण्यात आला.

शिवसेना आणि मनसेचे उमेदवार रांगेत उभे असतानाही विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचे अर्ज स्वीकारले गेले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

या सगळ्या प्रकारांकडे निवडणूक आयोग डोळेझाक करत असल्याचा आरोप करत, “निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात तब्बल ७० ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत असल्याचा उल्लेख करत, याआधीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस, अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, मनोहर जोशी यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या काळातही अशी परिस्थिती कधी पाहायला मिळाली नव्हती, असे त्यांनी नमूद केले.

महापौर आरक्षणावर संशय

निवडणूक निकालांना काही दिवस बाकी असताना अजूनही महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर न होणं हे नियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला. “कोण कुठे महापौर होणार हे आधीच ठरवून ठेवले आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत, निवडणूक आयोग निर्णय घेण्यासाठी सत्ताधारी नेत्यांच्या फोनची वाट पाहत असल्याची टीकाही करण्यात आली.

शिवाजी महाराजांवरील वक्तव्याने वाद

दरम्यान, सुरतमधील एका मेळाव्यात केंद्रीय मंत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरही संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका समाजाचे नाहीत, ते संपूर्ण महाराष्ट्राचे आणि हिंदवी स्वराज्याचे दैवत आहेत,” असे सांगत, शिवाजी महाराजांना जातीत अडकवण्याचा प्रयत्न म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत, सभेची तयारी

या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बहुचर्चित संयुक्त मुलाखत चित्रित होत असून, ती मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासावर केंद्रित असेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. मात्र, मुंबईतील संयुक्त सभा कधी आणि कुठे घ्यायची, याबाबत सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी कायम ठेवला.

“सभा कधी घ्यायची, कुठे घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. मैदानांवर दगड ठेवून, परवानग्या अडवून लोकशाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण प्रत्येक गोष्टीला अंत असतो,” असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com